Pune: काळे कपडे परिधान करणाऱ्यांचा हिरमाेड; शेकडोंना मोदींच्या सभास्थानी जाण्यापासून अडवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 01:59 PM2024-11-13T13:59:48+5:302024-11-13T14:00:20+5:30
काळे कपडे घालून दूरवरून आलेल्या अनेकांना सभा प्रत्यक्ष मैदानात बसून ऐकण्यापासून वंचित राहावे लागले
पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची जाहीर सभा मंगळवारी सायंकाळी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. तत्पूर्वी, या सभेला पाेहाेचण्यासाठी दुपारी ३:०० वाजेपासूनच कार्यकर्त्यांसह नागरिकांची रीघ लागली हाेती. यात अनवधानाने का हाेईना काळे कपडे परिधान करून आलेल्या शेकडाे नागरिकांना सभास्थानी जाण्यापासून अडविले गेले. त्यामुळे माेठ्या उत्साहाने आलेल्या अनेकांचा हिरमाेड झाल्याचे दिसून आले.
टिळक रस्ता, तसेच एस.पी. काॅलेजजवळील चाैकात काेंडी हाेऊ नये, यासाठी शहरातील विविध भागांतून सभास्थळी येणाऱ्या कार्यकर्त्यांची वाहने पार्क करण्याची ठिकठिकाणी व्यवस्था केली हाेती. तेथे वाहने उभे करीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते टिळक रस्त्यावरून रॅली काढून घाेषणाबाजी करीत सभास्थळी दाखल हाेत हाेते. या नागरिकांची मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने तपासणी करून त्यांना सभेच्या मैदानात साेडण्यात येत हाेते. यावेळी पाण्याची बाटली, झेंडे, काळ्या जॅकीटसह प्रवेश दिला जात नव्हता. सभेच्या ठिकाणी काळे कपडे परिधान करून आलेल्या कार्यकर्त्यांना पाेलिसांनी अडविले, तसेच मैदानात जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे दूरवरून आलेल्या अनेकांना सभा प्रत्यक्ष मैदानात बसून ऐकण्यापासून वंचित राहावे लागले.
माेदींचा ताफा पाहण्यासाठी नागरिकांत क्रेझ
प्रचार सभा आटाेपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा ताफा लाेहगाव विमानतळाकडे रवाना हाेणार हाेता. यावेळी लालबहादूर शास्त्री, फर्ग्युसन काॅलेज रस्त्याच्या दुतर्फा बांबूचे बॅरिकेड्स लावण्यात आले हाेते. प्रत्यक्षात माेदीजी यांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी नागरिक दाटीवाटीने ताटकळत थांबले हाेते. ताफा येताच नागरिकांनी ‘माेदी माेदी’ अशी घाेषणा देत एकच जल्लाेष केला.