पुणे - गरमागरम उपम्यात लपवले 1 कोटी 29 लाख रुपये, प्रवाशांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 04:03 PM2017-08-08T16:03:24+5:302017-08-08T16:06:16+5:30
परदेशी चलनाची तस्करी करणा-या दोन प्रवाशांना पुणे विमानतळावर अटक करण्यात आली आहे
पुणे, दि. 8 - परदेशी चलनाची तस्करी करणा-या दोन प्रवाशांना पुणे विमानतळावर अटक करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये एका महिला प्रवाशाचा समावेश आहे. हे दोघे प्रवासी दुबईला जात असताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे गरमागरम उपम्यात हे परदेशी चलन लपवून नेण्यात येत होतं. या दोघा प्रवाशांकडून एकूण एक कोटी 29 लाख रुपयांचं परदेशी चलन जप्त करण्यात आलं आहे.
रविवारी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ही कारवाई करण्यात आली अशी माहिती विमानतळ सुरक्षेशी संबंधित एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. इमिग्रेशन अधिका-याला निशांत अशी ओळख पटलेल्या प्रवाशाची कागदपत्रं पाहून संशय आला होता. संशय आल्यानंतर अधिका-याने तात्काळ कस्टम अधिका-यांशी संपर्क साधला. यानंतर कस्टम अधिका-यांनी पुन्हा एका प्रवाशाच्या सामानाची तपासणी करण्याचा आदेश दिला. सर्व सामानाची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली.
'सामानाची तपासणी केली असता बॅगेत उपमा असल्याचं आढळलं. मात्र उपमा ठेवलेल्या पिशवीचं वजन पाहता अधिका-यांना संशय आला, त्यामुळे त्यांनी पिशवी पुर्ण उघडून पाहिली असता त्याच्यात 86 हजाराचे अमेरिकन डॉलर्स आणि 15 हजाराचे युरो सापडले', अशी माहिती अधिका-याने दिली आहे.
काही वेळानंतर इमिग्रेशन अधिका-यांनी कस्टम अधिका-यांशी संवाद साधत अजून एका प्रवाशावर संशय असल्याचं सांगितलं. एच रंगलानी असं या महिला प्रवाशाचं नाव होतं. त्यादेखील त्याच विमानाने दुबईला जाणार होत्या. सीआयएसएफ सुरक्षा जवानांनी सामानाची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेतही उपमा असल्याचं आढळलं. तपासणी केली असता उपम्यात 86,200 अमेरिकन डॉलर्स आणि 15 हजाराचे युरो सापडले.
या दोन्ही प्रवाशांचा आणि घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का याची तपासणी कस्टम अधिकारी सध्या करत आहेत.