इतिहासकारांना राज्याला रस्ता दाखवावा; औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

By राजू हिंगे | Updated: March 16, 2025 19:17 IST2025-03-16T19:15:28+5:302025-03-16T19:17:18+5:30

प्रत्येकाची आस्था वेगळी आहे , सरकारने सर्वांच्या आस्थेचा आदर करावा

pune Historians should study show the way to the state Supriya Sule reaction to the demand to remove Aurangzeb's tomb | इतिहासकारांना राज्याला रस्ता दाखवावा; औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

इतिहासकारांना राज्याला रस्ता दाखवावा; औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पुणे  - औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत इतिहासकारांनी इतिहासाचा अभ्यास करून राज्याला मार्गदर्शन करावे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय, हे इतिहासकार ठरवतील. खरा इतिहास समोर आला पाहिजे. प्रत्येकाची आस्था वेगळी असते, त्यामुळे सरकारने सर्वांच्या आस्थेचा आदर करावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर बैठकीपूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “कोणताही राजकीय पक्ष नेहमीच निवडणूक मूडमध्ये असतो. या बैठकीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कळविला जाईल. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे आणि शेतमालाला हमीभाव देणे याचा राज्य सरकारला विसर पडला आहे. पारितोषिक विजेते शेतकरी व शिक्षक आत्महत्या करत आहेत, हे दुर्दैवी आहे. सातबारा कोरा करण्याचे काय झाले? हमीभावाचे काय झाले? आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचे पैसे कुठे वळवले गेले आहेत, हेही समोर आले आहे. बजेटमधील पैसे कोणीही आपल्या सोयीनुसार खर्च करू शकत नाही.



‘लाडकी बहिण योजना’ लागू केल्यामुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण आला असल्याचे एका मंत्र्यानेच सांगितले आहे. सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून बहिणींच्या विश्वासावर निवडणूक जिंकली, पण आता त्याच बहिणी त्यांना अडचण वाटू लागल्या आहेत. मात्र, बहिणींनी कोणाच्या घरी मागायला गेले नव्हते. त्यामुळे त्यांना सन्मानाने २,१०० रुपये मिळाले पाहिजेत,” असेही सुळे यांनी सांगितले.

“जय शिवराय” म्हणायला काय प्रॉब्लेम आहे?

“छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. ते रयतेचे राजे होते. ‘जय शिवराय’ म्हणायला काय अडचण आहे? ‘जय शिवराय’ ही समतेची भाषा आहे. यात काहीही चुकीचे नाही,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

विमानतळाबाबत विश्वासात घेतले नाही

“पुरंदर विमानतळ व्हावे, ही तेथील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला या प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. सरकारने सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

कृषी खाते भ्रष्टाचाराने बरबटलेले

“राज्याचे कृषी खाते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. भाजपचे आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि संदीप क्षीरसागर यांनीही वेळोवेळी कृषी खात्यातील भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम्ही केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे, आणि त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. मी लवकरच पुन्हा त्यांना भेटणार आहे. बीडमधील परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे, याबद्दल मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानते. मात्र, महाराष्ट्र सरकारला योग्य दिशा दाखवावी, अशी आमची त्यांच्याकडे विनंती आहे. साखर उद्योगासह शेतीविषयक मुद्द्यांवरही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ घेतली आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांसाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवणार

“माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शेतकरी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या निवडणुकीत आम्ही शेतकऱ्यांसाठी राजकारण बाजूला ठेवणार आहोत. हा पक्षाचा विषय नाही, तर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळेच ही निवडणूक आम्ही शेतकऱ्यांसाठी लढवणार आहोत,” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सरकारच्या अपयशावर टीका

“पाण्याचे नियोजन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. जर पाणी कमी-जास्त वाटप होत असेल, तर हे राज्य सरकारच्या अपयशाचे द्योतक आहे. लोकशाहीमध्ये आरोप-प्रत्यारोप होतच राहतात, पण या राज्यात सर्वात जास्त खंडणीखोर कोणत्या पक्षात आहेत, हे सर्वांना माहिती आहे,” असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

Web Title: pune Historians should study show the way to the state Supriya Sule reaction to the demand to remove Aurangzeb's tomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.