Pune: बारामतीच्या पतसंस्थेत तब्बल सव्वा दोन कोटींचा अपहार, चेअरमनसह तीन जणांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 09:32 PM2024-05-28T21:32:49+5:302024-05-28T21:33:08+5:30
Pune News: सहकारी पतसंस्थेत अधिकाराचा दुरुपयोग करत बोगस कागदपत्रांद्वारे ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारून तब्बल २ कोटी १८ लाख ७७ हजार २७५ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे चेअरमनसह तीन जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहॆ.
सांगवी - सहकारी पतसंस्थेत अधिकाराचा दुरुपयोग करत बोगस कागदपत्रांद्वारे ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारून तब्बल २ कोटी १८ लाख ७७ हजार २७५ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे चेअरमनसह तीन जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहॆ. शाकंबरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. असे अपहार झालेल्या पतसंस्थेचे नाव आहॆ.
याबाबत सुनिल मथुरा काळे (वय ५४) रा. वडगाव ता. करमाळा, जि. सोलापुर),व्यवसाय नोकरी (विशेष लेखापरीक्षक वर्ग-२, सहकारी संस्था, बारामती, ता. बारामती, जि. पुणे), यांनी फिर्याद दिली आहॆ.
पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिलेल्या माहिती नुसार शाकंबरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चे तत्कालिन सचिव अनिल बबनराव गलांडे (रा. शांभवी, अशोकनगर, बारामती ता. बारामती जि. पुणे), मुकुंद महादेव गिजरे मु.पो. सातव गल्ली, कसबा, बारामती ता. बारामती जि. पुणे), श्रीमती मंजुश्री विठ्ठल दुगम (रा. गोकुळवाडी, कचेरी रोड बारामती ता. बारामती जि.पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहॆ.
(दि. १ एप्रिल २०१० रोजी ते दि. ३१ मार्च २०२२) या कालावधित बारामतीत हा प्रकार घडला आहॆ. शाकंबरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. ता. बारामती या संस्थेचे तात्कालीन चेअरमन अनिल बबनराव गलांडे, तात्कालीन सचिन मुकुंद महादेव गिजरे व श्रीमती मंजुश्री विठ्ठल दुगम यांनी शाकंबरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. बारामती या पतसंस्थेचे कर्ज व्यवहारामध्ये गैरव्यवहार करुन रक्कम दोन कोटी अठरा लाख सत्त्यात्तर हजार दोनशे पंच्चाहात्तर फक्त या रकमेचा गैरव्यवहार अपाहार करुन सर्वांनी कट रचुन खोटी व बनावट कर्ज प्रकरणे तयार करुन, कर्ज खतावणी मध्ये चुकीच्या नोंदी नोंदवुन सहकारी कायदा, कानुन व पोट नियमांचे उल्लंघन करुन विना तारण कर्ज देवुन तसेच अपुरे कागपत्राचे आधारे तारणी कर्ज वाटप करुन संस्थेची व ठेवीदारांची फसवणुक करून स्वताच्या पदाचा गैरवापर करुन संगनमताने विश्वासघात करुन फसवणुक केली आहे.
सदर विनिर्दिष्ट अहवालानुसार सहायक निबंधक, सहकारी संस्था, बारामती यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81(5) (ब) मधील तरतूदी नुसार सदर संस्थेमधील गैरव्यवहारास जबाबदार असणा-या तत्कालीन चेअरमनसह तीन आरोपी विरुध्द शासनाच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल केला आहॆ. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे अधिक तपास करीत आहेत.