Pune: ज्येष्ठांसमोर घरातीलच वडीलधारे समजून पाया पडणारे बापट; आठवण कसबा विधानसभेची
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 15:32 IST2024-11-13T15:27:56+5:302024-11-13T15:32:39+5:30
कसब्यातील सामान्य नागरिकांबरोबर अशा प्रकारे नम्रतेने वागून हा मतदारसंघ बापटांनी सलग ५ टर्म स्वत:जवळ ठेवला

Pune: ज्येष्ठांसमोर घरातीलच वडीलधारे समजून पाया पडणारे बापट; आठवण कसबा विधानसभेची
राजू इनामदार
पुणे: निवडणुकीत उमेदवाराला काय करावे लागेल ते कधीच सांगता येत नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अंगी प्रचंड नम्रता बाणवावी लागते. ती नसेल तर काय होते ते अलीकडेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची एक चित्रफीत समाजमाध्यमांवरून प्रसारित झाली त्यावरून दिसते. पण ती वेगळी गोष्ट. नम्रतेबरोबरच उमेदवाराला आणखीनही बरेच कायकाय करावे लागते. पायी भरपूर फिरावे लागते. दिसेल त्याला हात जोडावे लागतात. चेहऱ्यावर सतत हास्य ठेवावे लागते. चिडता येत नाही, रागावता येत नाही, वाईट काही बोलता येत नाही. कार्यकर्ते साहेब, साहेब म्हणत असतात, पण ते सांगतील त्या भागात जावे लागते, ते सांगतील ते करावेच लागते.
अशा गोष्टी करण्यात पुण्यातील भाजपचे दिवंगत गिरीश बापट हे या सर्वच बाबतीत फारच प्रसिद्ध होते. ते कधीही दमत नसत, थकत नसत. निवडणूक काळात, त्यांच्या स्वत:च्या व पक्षातील इतरांच्याही, कुठेही जायची व कितीही फिरायची त्यांची तयारी असे. कसबा विधानसभा त्यांनी सलग ५ टर्म स्वत:जवळ ठेवला. त्याआधी ते ४ वेळा महापालिकेत नगरसेवक होते. अखेर खासदारही झाले. गल्लीपासून दिल्लीत गेलेला, लोकशाही व्यवस्थेतील सर्व सभागृहात सदस्य म्हणून राहिलेला मी एकमेव असे ते अभिमानाने सांगत.
हे छायाचित्र त्यांच्याच एका प्रचारफेरीतील आहे. कसबा विधानसभेतीलच. समोर सगळे ज्येष्ठ बसलेले आहेत. त्यातील बहुतेक खुर्चीवर बसलेले. बापट त्यांच्यासमोर बसलेले नाहीत. उलट प्रत्येकाच्या अगदी खाली वाकून घरातीलच कोणी वडिलधारे आहेत असे समदून पाया पडत आहेत. त्यांची ही नम्रताच त्यांना सातत्याने निवडून देत असावी.