Pune International Airport: पुण्यातून ‘एअर बबल’अंतर्गत शारजाला उडणार विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 11:44 AM2021-12-16T11:44:11+5:302021-12-16T11:46:21+5:30
पुणे-दुबई विमानसेवा डिसेंबर महिन्यात सुरू होणार होती. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध लावल्याने या सेवेस आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
प्रसाद कानडे
पुणे : पुणे-शारजा दरम्यान ‘एअर बबल’अंतर्गत विमानसेवा सुरू होत आहे. आखातातील शारजासाठी लवकरच ‘स्लॉट’देखील उपलब्ध केला जात आहे. पुण्याहून पहिल्यांदाच एअर बबल करारांतर्गत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे गेले जवळपास पावणेदोन वर्षे पुण्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. त्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘डोमेस्टिक’चे रूप प्राप्त झाले आहे. ‘एअर बबल’मुळे यात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे-दुबई विमानसेवा डिसेंबर महिन्यात सुरू होणार होती. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध लावल्याने या सेवेस आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मात्र तत्पूर्वी ‘एअर बबल’अंतर्गत पुण्याहून आंतरराष्ट्रीय सेवेचे जोरदार प्रयत्न झाले. पुण्यातील कोरोना संसर्गाचा दरही लक्षणीयरीत्या कमी झाल्याने दुबई सरकारनेही यास अनुकूलता दर्शवली. त्यामुळे डिसेंबर अखेर पुणे-शारजा विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.
पुणे-दुबईची तयारी पूर्ण
पुणे विमानतळावरून दुबईसाठी हवाई सेवा सुरू होणे जवळपास निश्चित झाले होते. दुबईसाठी ‘स्पाईस जेट’ला स्लॉटदेखील उपलब्ध झाला होता. पुण्याहून दररोज सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी दुबईच्या दिशेने विमान झेपावणार होते. मात्र त्याआधीच ओमायक्रॉनचे संकट आल्याने भारत सरकारने तत्काळ ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध लावले. त्याचा फटका पुणे-दुबई नियोजित सेवेला बसला.
‘एअर बबल’ करार म्हणजे काय?
कोरोना कालावधीत ज्यावेळी अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर बंदी आणली त्यावेळी भारतासह काही देशांनी ‘एअर बबल’ करार केला. कोरोना महामारीच्या काळातही विमानसेवा चालू ठेवण्यास आपली हरकत नसल्याचे दोन्ही देश काही अटींसह मान्य करतात. त्यास ‘एअर बबल’ करार म्हटले जाते.
पुणे-शारजा विमानसेवेसाठी एअर बबल करार केला जात आहे. त्याअंतर्गत लवकरच पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल. येत्या काही दिवसात तारीख निश्चित केली जाईल.
- संतोष डोके, विमानतळ संचालक, लोहगाव (पुणे) विमानतळ
पुण्याहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे. बबल कराराअंतर्गत विमानसेवा सुरू होत असेल तर ती चांगलीच बाब आहे. याच
कराराअंतर्गत दुबईसाठीदेखील विमानसेवा सुरू व्हावी.
- धैयशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ