Pune Airport | 5G प्लस सेवा देणारे पुणे विमानतळ देशात पहिले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 11:22 AM2022-11-18T11:22:14+5:302022-11-18T11:25:02+5:30
विमानतळाच्या टर्मिनलवर हायस्पीड ५ जी प्लस सेवा मिळणार...
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून ५ जी संदर्भातल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. ही सेवा कधी सुरू होणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पुण्यातील लोहगाव विमानतळावर गुरुवारी (दि. १७) ५ जी प्लस सेवेला सुरुवात झाली आणि ही सेवा देणारे देशातील पहिले विमानतळ, अशी पुणे विमानतळाची नोंद झाली.
पुण्यात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना आता विमानतळाच्या टर्मिनलवर हायस्पीड ५ जी प्लस सेवा मिळणार आहे. आगमन आणि प्रस्थान टर्मिनल्स, लाउंज, बोर्डिंग गेट्स, मायग्रेशन आणि इमिग्रेशन काउंटर, सुरक्षा क्षेत्रे, बॅगेज क्लेम बेल्ट्स, पार्किंग एरिया या ठिकाणी प्रवासी त्यांच्या मोबाईलवर जलद गतीच्या सेवेचा अनुभव घेणार आहेत.
५ जी स्मार्ट फोन असलेले सर्व ग्राहक त्यांच्या चालू डेटा प्लॅनवर या हाय स्पीड ५ जी प्लसचा आनंद घेऊ शकतात. सध्याचे या कंपनीचे ४ जी सिम हे ५ जी सक्षम असल्यामुळे सीम बदलण्याची आवश्यकता नाही.