Pune airport: तब्बल 15 दिवसांनंतर पुन्हा विमानसेवा सुरू; पहिल्या दिवशी ५२ विमानांचे उड्डाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 02:06 PM2021-10-30T14:06:26+5:302021-10-30T14:08:41+5:30
विमानांची वाहतूक सुरू होतानाच विमानतळ प्रशासनाने शनिवारपासूनच विंटर शेड्युलदेखील लागू केला आहे. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारपासून विमानसेवा सुरू होत असल्याने शुक्रवारी विमानतळावर एक प्रकारची लगीनघाई सुरू होती
पुणे: लोहगावविमानतळांवरून शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून विमानांच्या उड्डाणास सुरुवात झाली आहे. दिवसभरात ५२ विमानांची उड्डाणे होतील. जवळपास तेवढीच विमाने लोहगावविमानतळावर दाखल होतील. १५ दिवसांच्या बंदीनंतर विमानसेवा सुरू होत असल्याने पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानाचे दरही आकाशाला गवसणी घालत आहेत. पुणे ते नागपूर तिकिटाचे दर २१ हजार रुपयांच्या घरात गेले आहे.
विमानांची वाहतूक सुरू होतानाच विमानतळ प्रशासनाने शनिवारपासूनच विंटर शेड्युलदेखील लागू केला आहे. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारपासून विमानसेवा सुरू होत असल्याने शुक्रवारी विमानतळावर एक प्रकारची लगीनघाई सुरू होती. रात्री ८ वाजेपर्यंत विमांनाचे शेड्युल ठरले नव्हते. शनिवारपासून पुणे विमानतळाचा विंटर शेड्युल सुरू होत असल्याने त्याचे अतिरिक्त नियोजन करावे लागत आहे. विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून उड्डाण करणाऱ्यांच्या विमानांच्या संख्येत वाढ होत आहे. विमानतळ प्रशासनाने हे अद्याप जाहीर केले नसले तरीही जयपूर, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद आदी शहरांना जाणाऱ्या विमानाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.