पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ ) यंदा ४ ते ११ मार्च दरम्यान रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 02:06 PM2021-01-20T14:06:46+5:302021-01-20T14:09:01+5:30
१५० चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार
पुणे : कोरोनाचे सावट असल्याने यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन रद्द वा पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने या महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची वाट मोकळी झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्व चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ ) ४ मार्च ते ११ मार्च रंगणार आहे. या महोत्सवाचे आयोजन 'हायब्रीड' म्हणजेच ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे करण्यात येणार आहे, अशी माहिती पिफ चे आयोजक व ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पुणे चित्रपट महोत्सव याआधी 14 ते 21 जानेवारी 2021 दरम्यान जाहीर करण्यात आला होता. मात्र गोव्यात ईफ्फी हा महोत्सव 16 ते 21 जानेवारी दरम्यान होत असल्याने एकाच वेळी दोन्ही महोत्सव आल्याने पिफच्या आयोजनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता आज झालेल्या पत्रकार परिषदेत जब्बार पटेल यांनी पिफच्या अधिकृत तारखांची घोषणा केली आहे. हा महोत्सव येत्या ४ मार्च ते ११ मार्च या दरम्यान होणार असून त्यात जवळपास १५० चित्रपटांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. हा महोत्सव ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारात रसिकांना अनुभवता येणार आहे. पटेल म्हणाले, यावर्षी महोत्सवाचा विस्तार करून आणखी एक शहराचा करण्यात आला आहे. त्या शहराचे नाव लातूर आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री लातूरचे आहेत त्यामुळे हे शहराची यंदा भर घालण्यात आल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पुण्यानंतर मुंबई, नागपूर आणि लातूर मध्ये महोत्सव होणार आहे. लातूरमध्ये मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महोत्सव होणार आहे
पुण्यात डिसेंबर - जानेवारी महिना हा विविध सांस्कृतिक महोत्सवांचा सुवर्ण काळ असतो. सांगीतिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या पर्वणीमुळे शहरातील वातावरण कलात्मक होऊन जाते. परंतु यंदा महोत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याने चित्रपट महोत्सव ’ऑनलाइन’ की ’ऑफलाइन’ होणार याविषयी रसिकांमध्ये उत्सुकता होती.