पुणे हे गतीने विकसित होणारे शहर; महामार्ग बांधल्यावरच वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 01:29 PM2024-05-12T13:29:04+5:302024-05-12T13:29:34+5:30
पुणे-संभाजीनगर, पुणे-नाशिक, पुणे-नगर, चाकण-मुंबई या रस्त्यांवर मल्टीलेयर फ्लायओव्हर मार्ग बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे
वाघोली : पुणे ते संभाजीनगर अंतर दोन तासात पार करून पोहोचता येईल, असा पुणे - संभाजीनगर महामार्ग येत्या काळात लवकर तयार करण्यात येणार आहे, असे रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाघोलीतील सभेत सांगितले. राज्य सरकारच्या माध्यमातून व दहा हजार कोटी रुपये खर्च करून पुणे ते शिरूर मल्टीलेयर फ्लायओव्हर मार्ग बांधणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली.
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार बापू पठारे, संदीप सातव, शांताराम कटके, विजय जाचक, रामदास दाभाडे उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले की, पुणे हे गतीने विकसित होणारे शहर आहे. यामुळे कितीही रस्ते बांधले तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठीच दोन लाख कोटी रुपयांची विकासकामे पुण्यात केली. महाराष्ट्र संतांची भूमी आल्याने पुणे ते पंढरपूर पालखी महामार्ग बांधला. त्याचे निवडणुकीनंतर उद्घाटन होईल. पुणे, सोलापूर, संभाजीनगर या शहरांत वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी रस्ते बांधणी केली जाणार आहे. विशेषतः पुणे-नाशिक व पुणे-नगर, चाकण-मुंबई या रस्त्यांवर मल्टीलेयर फ्लायओव्हर मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. हे रस्ते बांधल्यानंतर कोंडीचा प्रश्न दूर होईल.
पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे त्यासाठी तिसरी महापालिका करणार
पुण्याची तिसरी महापालिका केल्याशिवाय विकास होणार नाही. ती करण्यासाठी गावांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. लोकसंख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येचे व समस्यांचे योग्य नियोजन करण्यासाठी स्वतंत्र महापालिका गरजेची असून, तुम्हाला विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.