पुणे ठरतेय काेराेनाचा हाॅटस्पाॅट; राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 01:33 PM2022-07-04T13:33:53+5:302022-07-04T13:35:20+5:30
मुंबई दुसऱ्या क्रमांकावर...
पुणे : राज्यात मागील तीनही लाटांमध्ये पुणे हे काेराेना रुग्णांबाबत हाॅटस्पाॅट राहिले आहे. आतादेखील रुग्णसंख्या वाढत असून, दाेन्ही महापालिका व ग्रामीण भाग मिळून पुण्यात सध्या २० हजार ५४६ काेरोना रुग्ण सक्रिय आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्यात सक्रिय रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. यावरून पुणे हे पुन्हा एकदा काेराेनाचे हाॅटस्पाॅट बनू पाहत आहे.
शहरात सध्या ९ हजार ७१४, पिंपरी चिंचवडमध्ये ३ हजार ६२६ आणि ग्रामीणमध्ये ७ हजार २०५ असे एकूण मिळून २० हजार ५४६ रुग्ण सक्रिय आहेत. त्याखालाेखाल मुंबई महापालिका असून, तेथे १९ हजार ६१७ रुग्ण सक्रिय आहेत. तिसऱ्या क्रमांकावर नागपूर, चाैथ्या नाशिक व पाचव्या क्रमांकावर नगर जिल्हा आहे.
राज्यात सध्या दरराेज अडीच ते साडेतीन हजार काेराेनारुग्ण वाढत आहेत. त्यापैकी सर्वाधिक वाढ मुंबई किंवा पुण्यात हाेत आहे. संभाव्य चाैथी लाट आली तर त्यात रुग्णसंख्येबाबत पुणे टाॅपवर राहण्याची शक्यता आहे. दिलासादायक बाब म्हणजे बहुतांश रुग्णांना किरकाेळ लक्षणे असून, दाखल रुग्णांची संख्या अत्यल्प आहे.
जिल्हानिहाय धाेकादायक स्थिती
पुणे - २० हजार ५४६
मुंबई - १९ हजार ६१७
नागपूर - ९ हजार २१३
नाशिक - ८ हजार ५२६
अहमदनगर - ७ हजार २४३
दिलासादायक चित्र
हिंगाेली - १०
परभणी - १२
नंदुरबार - २०
गाेंदिया - २३
बीड - २५
राज्यात २,९६२ रुग्णांची भर
राज्यात रविवारी (दि. ३) दिवसभरात २ हजार ९६३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पुणे शहर ४२७, पिंपरी चिंचवड १९८; तर पुणे ग्रामीणमधील १९५ रुग्ण आहेत. मुंबईमध्ये बीए. ४ व्हेरिएंटचा १ नवा रुग्ण आढळला आहे. ती ६० वर्षांची महिला असून, ती घरगुती विलगीकरणात बरी झाली. आतापर्यंत राज्यात ६४ नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
आकडे बाेलतात
- ८ काेटी २१ लाख काेराेना चाचण्या
- ७९ लाख ८५ हजार रुग्णांचे निदान
- बरे झालेले रुग्ण ७८ लाख १४ हजार
- रुग्ण सक्रिय २२ हजार ४८५
- मृत्यू - १ लाख ४७ हजार.