स्पशेल रिपोर्ट: भूजल पातळीत पुणे ठरले उणे, आकडेवारीतून उघड; जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 12:18 PM2024-04-24T12:18:23+5:302024-04-24T12:19:04+5:30
पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत जाणार आहे, असे भूजल विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे....
पुणे : दिवसेंदिवस पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पुणे जिल्ह्यातील भूजलाची पातळी अधिकच खालावत चालली आहे. एकीकडे समाधानकारक पाऊस नाही आणि दुसरीकडे उपसा माेठ्या प्रमाणावर वाढलेला. त्यामुळे परिणामी १३ तालुक्यांत भूजलाची पातळी उणे झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत जाणार आहे, असे भूजल विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
राज्यातील भूजलाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असून, अनेक तालुक्यांत दुष्काळी स्थिती गंभीर बनत आहे. भूजल विभागाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये तालुक्यातील भूजलाच्या पातळीचे आकडे जाहीर करण्यात आले. त्यानुसार अनेक तालुक्यांतील भूजल पातळी खालावल्याचे समोर आले आहे. त्यात पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे.
अहवाल काय सांगताे?
- जानेवारी महिन्यात आंबेगाव तालुक्यामध्ये पाणीपातळी प्लस होती. ती आता उणे झाली आहे. पावसाळ्यात झालेला अपुरा पाऊस आणि पाण्याचा वाढता उपसा यामुळे पुणे जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी चार ते पाच फुटांहून अधिक घट झाली आहे.
- भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील १३ पैकी १३ तालुक्यांमधील पाणीपातळीत मार्च महिन्यात ०.०१ ते ०.८४ फूट इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे.
जुन्नरला सर्वाधिक संकट !
यंदा जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ८.४४ फुटांनी पाणीपातळी खालावली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत राज्यातील सर्व तालुक्यांमधील भूजल पातळीच्या नोंदी सातत्याने घेतल्या जातात. या नोंदींतून पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भूजल पातळीत झालेली वाढ, तसेच घट समजते. शिरूर, पुरंदर, इंदापूर, हवेली, दौंड, बारामती, आंबेगाव या ठिकाणची पाणीपातळी देखील इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक खालावली आहे.
कशा करतात नोंदी? :
भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता पाणलोट क्षेत्रात तीन निरीक्षण विहिरी याप्रमाणे जिल्ह्यात १९२ निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. यामध्ये ७१ कूपनलिका समाविष्ट आहेत. यातील पाण्याचा उपसा करण्यात येत नाही. भूजल विभागाने मार्च महिन्यात घेतलेल्या नोंदींचा अभ्यास करून त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यातून जिल्ह्यातील भूजल पातळीत घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.
तालुकानिहाय पाणीपातळीतील घट (प्रमाण-फूट)
तालुका - सरासरी मार्चची- मार्च २०२४ - घट
आंबेगाव - ४.९३ - ५.१६ - उणे ०.२३
बारामती - ६.०२ - ६.४१ - उणे ०.३९
भोर - ३.३९ - ४.११ - उणे ०.७२
दौंड - ५.९१ - ६.२८ - उणे ०.३८
हवेली - ५.५६ - ५.७० - उणे ०.१४
इंदापूर - ६.४२ - ६.६० - उणे ०.१७
जुन्नर - ८.३७ - ८.४४ - उणे ०.०७
खेड - ४.७३ - ४.७४ - उणे ०.०१
मावळ - २.२६ - २.६१- उणे ०.३५
मुळशी - २.८१ - ३.४३ - उणे ०.६२
पुरंदर - ६.९७ - ७.०२ - उणे ०.०६
शिरूर - ६.२५ - ७.०९ - उणे ०.८४
वेल्हा - ३.५० - ४.२५ - उणे ०.७५
राज्यातील ३५३ तालुक्यांचा अहवाल :
भूजल विभागाने राज्यातील ३५३ तालुक्यांमधील भूजलाच्या नोंदी घेतल्या गेल्या. त्यात ३२६ तालुक्यांमध्ये सर्वसाधारणपणे पाणीपातळी खालावलेली असल्याचे दिसून आले आहे. तर २७ तालुक्यांना दुष्काळाचा अधिक फटका बसत आहे. नाशिक जिल्ह्यामधील १० तालुक्यांना; तर उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांतील ४ तालुक्यांना सर्वाधिक झळ बसत आहे.
गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे भूजल साठा कमी झाला. त्यानंतर पुणे जिल्ह्यात पाण्याचा उपसा सर्वाधिक होत आहे. भूजल पुनर्भरण मात्र त्याप्रमाणात होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे.
- उपेंद्र धोंडे, भूवैज्ञानिक, जलशक्ती मंत्रालय