राज्यातील सर्वात कमी तापमान; पुणे @ ११ डिग्री
By श्रीकिशन काळे | Published: November 19, 2024 03:20 PM2024-11-19T15:20:06+5:302024-11-19T15:36:34+5:30
पुण्यातील तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून, पुणेकरांना थंडीचा अनुभव येत आहे
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून, पुणेकरांना थंडीचा अनुभव येत आहे. आज मंगळवारी (दि.१९) किमान तापमान ११ अंशावर नोंदले गेले. राज्यातील हे सर्वात कमी किमान तापमान आहे. सोमवारी धुळे येथे सर्वात कमी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
शहरातील एनडीए परिसरात आज सर्वात कमी ११.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर शिवाजीनगरला १२.९ तापमानाची नोंद झाली. दिवाळीमध्ये थंडीचा मागसूस देखील नव्हता, पण त्यानंतर आता थंडीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये आणखी पारा घसरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पावसाळी वातावरण आता निवळले आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात तापमानाचा पारा घसरत आहे. परिणामी राज्यात थंडी वाढू लागली आहे. आज किमान तापमान ११ अशांपर्यंत घसरले असल्याचे दिसून येत आहे.
आजपासून (दि. १९) राज्याच्या तापमानात २ ते ३ अंशांनी आणखी घट होणार असल्याने राज्यातील गारठा वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सध्या कोमोरिन भाग आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झालेली आहे. दक्षिण भारतात पाऊस सुरू असून, उत्तर भारतात आकाश निरभ्र आहे. त्याने थंडीत वाढ होत आहे.
पुण्यातील मंगळवारचे किमान तापमान
एनडीए : ११.६
बारामती : ११.८
हवेली : ११.९
तळेगाव :१२
शिवाजीनगर : १२.९
पाषाण : १३.३
इंदापूर : १३.६
हडपसर : १५.२
कोरेगाव पार्क : १७.४
लोणावळा : १८.४
वडगावशेरी : १८.४
मगरपट्टा : १८.६