पुण्यात 'हाऊस फुल पराठा' नावानं व्यवसाय करण्यास मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 04:36 PM2021-09-22T16:36:47+5:302021-09-22T16:37:34+5:30
नाव व व्यापारचिन्ह स्वामित्वाचा भंग केल्याचा ठपका
पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील ’हाऊस ऑफ पराठा’ च्या शेजारी ‘हाऊस फुल पराठा’ नावानं सुरू असलेल्या हॉटेलनं नाव व व्यापारचिन्ह स्वामित्वाचा (नोंदणीकृत ट्रेड मार्कचा) भंग केल्याचे स्पष्ट करीत, ’हाऊस फुल पराठा’ या नावानं व्यवसाय करण्यास पुणे येथील जिल्हा न्यायालयानं मनाईहुकूम जारी केला आहे. ‘हाऊस ऑफ पराठा’ या हॉटेलच्या व्यवस्थापनानं दाखल केलेल्या दाव्यात जिल्हा न्यायाधीश व्ही. के. यावलकर यांनी हा निकाल दिला आहे.
२०१७ साली ‘हाऊस फुल पराठा’ या नावानं ट्रेडमार्क नोंदणी साठी अर्ज करण्यात आला होता. मात्र ‘हाऊस ऑफ पराठा’ या नावानं आधीच ट्रेडमार्क नोंदणीकृत असल्यामुळे व त्यांनी हरकत घेतली असल्याने ‘हाऊस फुल पराठा’ यांचा ट्रेडमार्क नोंदणीचा अर्ज जानेवारी २०२० रोजी फेटाळला गेला. त्यानंतरही ‘हाऊस फुल पराठा’ या नावाने त्याचे व्यवस्थापनाने पराठा विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवल्याने ’हाऊस ऑफ पराठा’ च्या व्यवस्थापनानं अँड. ओजस देवळणकर यांच्या वतीनं पुणे जिल्हा न्यायालयात मनाईचा दावा दाखल केला. ‘हाऊस ऑफ पराठा’ हा नामांकित नोंदणीकृत ब्रँड आहे.
तसेच त्याच्या इतरत्र शाखा असून, नुकतीच गुजरात मधील सुरत येथेसुद्धा ‘हाऊस ऑफ पराठा’ची शाखा सुरू झाली आहे. असा युक्तिवाद अँड देवळणकर आणि अँड विवेक चव्हाण यांनी केला. जिल्हा न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून 1 सप्टेंबर रोजी ‘हाऊस फुल पराठा’ च्या व्यवस्थापनानं ट्रेडमार्कचा भंग केल्याचं मान्य करून हाऊस ऑफ पराठा’ या नामसदृश्य किंवा इतर प्रकारे साम्य असेल अशा प्रकारे खाद्यपदार्थाचा विक्री व्यवसाय करू नये असे आदेश दिले आहेत.