पुणे : दुसरी लाट ओसरताच 'जम्बो' कोविड सेंटर बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 11:41 PM2021-07-02T23:41:11+5:302021-07-02T23:43:57+5:30

शेवटच्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू. मार्चपासून ३००० रुग्णांवर उपचार.

Pune Jumbo covid center closed as soon as the second wave patients number decreases | पुणे : दुसरी लाट ओसरताच 'जम्बो' कोविड सेंटर बंद 

पुणे : दुसरी लाट ओसरताच 'जम्बो' कोविड सेंटर बंद 

googlenewsNext
ठळक मुद्देशेवटच्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू.मार्चपासून ३००० रुग्णांवर उपचार.

पुणे : पुणेकरांसह अन्य जिल्ह्यातील नागरिकांना जम्बो कोविड रुग्णालयामुळे मोठा दिलासा मिळाला. दुसऱ्या लाट ओसरू लागल्याने जम्बोमधील रुग्ण कमी झाले होते. त्यानंतर जम्बोमध्ये नवीन रुग्ण दाखल करून घेणे थंबविण्यात आले होते. शुक्रवारी जम्बो अखेर पुन्हा बंद करण्यात आल्याची  माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

जम्बोमधील रुग्ण कमी झाल्यानंतर १ जून रोजी रुग्णालयातील ३०० ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आठवडाभराने आणखी १०० खाटा कमी करण्यात आल्या. केवळ २०० खाटा कार्यान्वित ठेवण्यात आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय १५ जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर २२ मार्चपासून जम्बो पुन्हा सुरू करण्यात आले.

दुसऱ्या लाटेत जम्बो पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर त्याची क्षमता ७०० रुग्णांवर नेण्यात आली होती. दुसऱ्या लाटेमध्येही ३००९ रुग्णांना या रुग्णालयाचा मोठा फायदा झाला. मागील दीड महिन्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने खाली गेली आहे. शहराचा पॉझिटिव्हीटी रेटही पाच टक्क्यांच्या खाली आला होता. रुग्णसंख्या घटत गेल्याने ऑक्सिजनवरील रूग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेडची मागणी कमी झाली आहे.

जम्बोमध्ये नवीन रुग्णांचे प्रवेश बंद करण्यात आल्यानंतर तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज मिळेपर्यंत ५० बेडचे आयसीयू आणि एचडीयू विभाग सुरू ठेवण्यात आला होता. हे रुग्ण अन्यत्र हलविण्यात आले नव्हते. त्यामुळे शेवटच्या रुग्णापर्यंत येथील यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात आली होती. जम्बोमध्ये शेवटचा एकच रुग्ण होता. सुरुवातीपासूनच अत्यवस्थ असलेल्या या शेवटच्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. 

दुसऱ्या लाटेत जम्बोमध्ये झालेल्या उपचारांची आकडेवारी
२२ मार्च ते १ जुलै
एकूण दाखल रुग्ण - ३००९
बरे झालेले रुग्ण - १९०९
स्वेच्छेने अन्य रुग्णालयात गेलेले - ४४६
मृत्यू - ६५४

'जम्बो'चे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट
जम्बो कोविड सेंटरने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पुणेकरांसह परजिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कोरोना काळात जम्बोच्या माध्यमातून मोठी वैद्यकीय यंत्रणा लोकांच्या सेवेत कार्यान्वित झाली होती. जम्बो आता पुन्हा तात्पुरते बंद करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार ते पुन्हा उघडले जाईल. दरम्यान, आयआयटी दिल्लीकडून पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.
- रुबल अगरवाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.)

Web Title: Pune Jumbo covid center closed as soon as the second wave patients number decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.