Pune Jumbo Hospital Closed: जम्बो हॉस्पिटलला ‘बाय बाय’; वैद्यकीय साहित्य हलवणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 08:39 PM2022-03-08T20:39:27+5:302022-03-08T20:40:02+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच जम्बो हॉस्पिटल बंद करण्याची घोषणा केली होती
पुणे : कोरोना आपत्तीत हजारो कोरोना बाधितांवर मोफत उपचार देणारे जम्बो हॉस्पिटल लवकरच बंद करण्यात येणार आहे. यामुळे या हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर, सेमी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड आदी वैद्यकीय साहित्यांची तपासणी महापालिकेकडून करण्यात येत असून, त्याचा अहवाल तयार करून महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ते हलविण्यात येणार आहेत.
कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या व तिसरी लाटही आता पूर्णत: ओसरली असल्याने, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच जम्बो हॉस्पिटल बंद करण्याची घोषणा केली होती. यामुळे महापालिकेने या हॉस्पिटलमधील सर्व वैद्यकीय वस्तूंची मोजदाद करून त्यातील किती यंत्रणा चालू आहेत, काय दुरूस्त करावे लागेल, याकरिता काम सुरू केली आहेत. येथील वैद्यकीय उपकरणे, खाटा अन्य साधनसामग्री महापालिकेच्या बाणेर येथील जुन्या डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये ज्या वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता आहे, ती उपकरणे तेथे पुरविण्यात येणार आहेत.
जम्बो हॉस्पिटलमधील जी उपकरणे महापालिकेला हवी आहेत, त्याची यादी विभागीय आयुक्त कार्यालयास सुपूर्द करून, उर्वरित साहित्य ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहे. याचा अंतिम निर्णय हा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.
लसीकरण केंद्रे कमी करणार
महापालिकेच्यावतीने शहरातील १८२ ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत. यातील महापालिकेच्या ७१ रुग्णांलयांमध्ये सुरू असलेले लसीकरण कायम ठेवून उर्वरित लसीकरण केंद्रांची संख्या आता कमी करण्यात येणार आहे. शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिक येत नसल्याचे दिसून आले आहे; तर नगरसेवकांनी स्वत:हून नागरिक येत नसल्याने आपल्या प्रभागातील लसीकरण केंद्र बंद करण्याचे पत्र दिले आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व लसीकरण केंद्रांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये जवळजवळ असलेली दोन लसीकरण केंद्रे एकत्र करणे, जेथे अत्यल्प प्रतिसाद आहे, ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.