त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 07:31 AM2024-05-22T07:31:52+5:302024-05-22T07:32:43+5:30
Sonali Tanpure on Pune Porsche Car Accident: ६०० कोटींचा मालक असलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या या मुलाने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले होते. या मुलाच्या शाळेतील कृत्यांबाबत राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी खुलासा केला आहे.
दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पोर्शे कारच्या अपघातातील अल्पवयीन आरोपीबाबत आज मोठा खुलासा झाला आहे. ६०० कोटींचा मालक असलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या या मुलाने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले होते. या मुलाच्या शाळेतील कृत्यांबाबत राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी खुलासा केला आहे.
जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे हे मामा भाचे आहेत. एवढे राजकीय वजन असूनही हा बिल्डर आणि त्याचा मुलगा किती मुजोर होता हे यावरून दिसत आहे. बिल्डरच्या या मुलामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा सोडावी लागली होती. सोनाली यांनी बिल्डरच्या मुलासह काही मुलांची तक्रार त्यांच्या पालकांकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर मी माझ्या मुलाला त्या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत शिकविल्याचे सोनाली या म्हणाल्या आहेत.
सोनाली तनपुरे यांनी ट्विट करून बिल्डरच्या प्रतापी मुलाचा भांडाफोड केला आहे. सोनाली यांनी नाव न घेता त्या मुलाचा उल्लेख केला आहे. ''कल्याणीनगर येथील कार ॲक्सिडंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता'', असा गंभीर आरोप सोनाली तनपुरे यांनी केला आहे.
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या...
— Sonali Tanpure (@TanpureSonali) May 21, 2024
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.
त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, अशी मागणीही सोनाली यांनी केली आहे. एकंदरीतच या बिल्डर अग्रवाल आणि त्याच्या मुलाबाबत अनेक गौप्यस्फोट येत्या काळात होण्याची शक्यता आहे.