Kasba By Elelction: 'आता दुसऱ्याला संधी देऊन बघू...' कसब्यातील मतदारांचा कौल कोणाकडे? पहा व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:52 PM2023-02-21T12:52:12+5:302023-02-21T12:52:32+5:30
आम्हाला कोणीही लोकप्रतिनिधी उत्सवापुरता हजेरी लावणारा नको
पुणे: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दोन्हीकडे भाजप आणि महविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दोन्ही पक्षाचे नेते बैठका घेण्याबरोबरच प्रचारातही सहभागी होत आहेत. राज्याचे मुखमंत्री , उपमुख्यमंत्री यांनीसुद्धा निवडणुकीच्या अनुषंगाने कसबा - चिंचवड मतदार संघात भेटी दिल्या आहेत. तसेच त्या भागातील नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या आहेत.
कसबा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक आगामी महापालिकेच्या निवडणुकांचं भविष्य ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे, या विधानसभेत गेली ३० वर्षे भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपने कसब्यातील सीट मिळ्वण्यासाठी कंबर कसली आहे. तर महविकास आघाडीसुद्धा जोरदार प्रचार करू लागली आहे. परंतु येथील नागरिकांचा कौल कोणाकडे आहे. याबाबत लोकमतने कसबा मतदार संघातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप बास झालं आम्ही दुसऱ्याला संधी देऊन बघू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हेमंत रासने यांना आम्ही कधीच पहिले नाही, ते कसब्यात कधीच दिसले नाहीत. तर रासने यांच्यापर्यंत सामान्य माणूस पोहचू शकत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. भाजपच्या आधीच्या आमदाराबाबत विचारले असता मतदार म्हणाले, भाजपच्या आधीच्या आमदार आम्हाला कधीही भेटायला आल्या नाहीत. इथे वाहतूककोंडी, पाणी, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत. महागाई खूप वाढली आहे. याबद्दल त्यांनी कधी विचारलं नाही.
रवींद्र धंगेकर यांचा सामान्यांशी दांडगा संपर्क
रवींद्र धंगेकर यांनी सामान्य माणसाला खूप मदत केली. कोरोना काळातही या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवल्या आहेत. आता आम्हाला वाटतंय की, धंगेकरच निवडून येऊ शकतात. कारण सामान्य माणूस रासने यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही पण धंगेकरांपर्यंत पोहचू शकतो. त्यांना कधीही बोलावलं तरी ते धावून येतात. एक व्यक्ती म्हणून धंगेकर साहेब खूपच चांगले आहेत. लोकांचा धंगेकर यांच्यावर विश्वास आहे, ते निवडून आल्यावर आपली कामे नक्कीच होतील. आता तरी चित्र असं दिसू लागले आहे की, धंगेकरच निवडून येतील. असे ठाम मतही नागरिकंनी व्यक्त केले.
आता दुसऱ्याला संधी देऊन बघू
आम्हाला कोणीही लोकप्रतिनिधी उत्सवापुरता हजेरी लावणारा नकोय. रवींद्र धंगेकर हे येऊन भेटू गेले आहेत. ते नेहमी सामान्य माणसांच्या संपर्कात असतात. इथे कित्येक वर्ष भाजपचं आहे. आता निवडणुकीच्या काळात भाजपचे मोठे नेते इथे आले तरी ते आमच्या गरजा पूर्ण करणार आहेत का? येथील लोकप्रतिनिधीच आमच्या गरज पूर्ण करतील. त्यामुळे आता भाजप बास झालं. आम्ही दुसऱ्याला संधी देऊन बघणार आहोत.