Pune: आर्थिक वादातून ७ वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण; दोन महिलांना ठोकल्या बेड्या
By विवेक भुसे | Published: August 10, 2022 08:44 PM2022-08-10T20:44:42+5:302022-08-10T20:45:06+5:30
स्वारगेट पोलिसांनी या मुलीची मोहोळ येथून सुखरुप सुटका केली
पुणे : आर्थिक व्यवहारातून एका सात वर्षाच्याचिमुरडीचे अपहरण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. वैशाली पोशंटी शिंदे (वय ३०, रा.मोहोळ, जि. सोलापूर), रेश्मा समीर शेख (वय ३०, रा.कात्रज) अशी दोघींची नावे आहेत. तर मुख्य सुत्रधार महिला करिश्मा गोटुराम काळे उर्फ करिश्मा राजु पवार (वय २०, रा. चिखली,जि. सोलापूर) हिच्यासह तिघींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लोणावळा येथील एका २१ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना स्वारगेट बसस्थानक परिसरात ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. स्वारगेट पोलिसांनी या मुलीची मोहोळ येथून सुखरुप सुटका केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व करिश्मा या दोघींत आर्थिक व्यवहार होते. दोघी एकमेकींच्या नातेवाईक आहेत. करिश्मा ही फिर्यादीकडे पैसे मागत होती. त्यातूनच करिश्मा हिने तिच्या इतर दोन साथीदार महिला वैशाली व रेश्मा यांना सोबत घेऊन अंजली हिची तुलसी पवार हिचे स्वारगेट बसस्थानक परिसरातून अपहरण केले. फिर्यादी ही पंढरपूरला तिच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी निघाली असताना, स्वारगेट बसस्थानक परिसरात आली होती. त्यावेळी करिश्मा आणि तिची भेट झाली होती. तिने फिर्यादीच्या ७ वर्षाच्या बहिणीला पळवून नेले. हा प्रकार घडल्यानंतर तिने स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत बहिणीच्या अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार पोलिसांनी तपास करून वैशाली व रेश्मा या दोघींना कात्रज परिसरातून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत करिश्मा हि मुलीला घेऊन तिच्या आई-वडिलांच्या गावी मोहोळ येथे गेल्याचे समजले. तसेच पोलिस देखील तांत्रिक विश्लेषनाद्वारे तपास करत होते. त्यावेळी करिश्माचे लोकेशन कधी पंढरपूर तर कधी मोहोळ परिसरात दिसून येत होते. त्यानुसार स्वारगेट पोलीस तिच्या मागावर होते. तिला पोलिस मागावर असल्याची चाहूल लागल्याने तिने या मुलीला चिखली येथील गावात आपल्या आई-वडिलांकडे सोडून दिले. त्यानंतर तिने तेथून पळ काढला होता. तिच्या आईवडीलांनी या मुलीला मोहोळ पोलिसांकडे सोपविले. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांनी दिली.