पुणे किडनी रॅकेेट प्रकरण: आणखी दोघांच्या किडनी दिल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:25 AM2022-05-19T11:25:30+5:302022-05-19T11:29:19+5:30
आंतरराज्य टोळी असल्याची शक्यता...
पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपणप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एजंटांनी आणखी दोघांना किडनी मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी सहा वर्षांपूर्वी बदलापूर येथील एका डॉक्टरांच्या वडिलांना आणि पंढरपूर येथील एकास किडनी मिळवून दिली असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
अभिजीत शशिकांत गटणे (वय ४०, रा. एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय ४३, रा. लांडेवाडी, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या एजंटांची नावे आहेत. या दोघांनी त्यांची किडनी दिल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.
आरोपींनी मिळवून दिलेल्या किडन्यांचे ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणि कोइमतूर येथील केएचसीएच हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण झाले आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
रोडगे याने त्यावेळचा एजंट सावंत याच्या मदतीने त्याची एक किडनी कल्याणीनगर येथे राहणाऱ्या एका मुलीला दिली. ती मुलगी त्याच्या घरातील नोकर असल्याचे त्याने दाखविले आहे. गटणे याने देखील २०१२ साली सावंत याच्या मदतीने त्याची एक किडनी बंगलोर येथे राहणाऱ्या एकाला दिली आहे. ते मामा असल्याचे त्याने कागदोपत्री दाखविले.
दोन्ही आरोपींनी सुमारे सहा वर्षांपूर्वी बदलापूर येथील डॉ. निमसाखरे यांच्या वडिलांना इस्लामपूर येथील गजेंद्र ठोंबरे यांची किडनी मिळवून दिली. प्रत्यारोपणाची प्रक्रिया ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पार पडली. सुमारे दोन वर्षांपूर्वी पंढरपूर येथील विठ्ठल बागल यांना पुण्यातील राणी नावाच्या महिलेची किडनी मिळवून दिली. संबंधित महिला ही विठ्ठल बागल यांची पत्नी असल्याचे कागदपत्रे त्यावेळी सादर केली होती. कोइमतूर केएमसीएच हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन झाले.
आंतरराज्य टोळी असल्याची शक्यता
या गुन्ह्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून यामध्ये आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यासाठी आरोपीकडे तपास करण्यासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी केली.
तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
खोटी कागदपत्रे सादर करून भलत्याच व्यक्तींना किडनी दिल्याचे आणखी दोन प्रकरणे या गुन्ह्याच्या तपासातून पुढे आले आहेत. या गुन्ह्यांची व्याप्ती वाढतच असून, त्यांची सविस्तर चौकशी करण्यासाठी आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असल्याचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.