दरड कोसळल्यानं माळशेज घाटातील वाहतूक दोन दिवस बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 07:33 AM2018-08-21T07:33:36+5:302018-08-21T13:40:56+5:30
माळशेज घाटात आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आहे. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
पुणे - अहमदनगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात मंगळवारी उशीरा रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास छत्री पाँइंटजवळ ही घटना घडली आहे. या घटनेत आयशर टेम्पोवर दरड कोसळल्यानं टेम्पोचा चेंदामेंदा झाला असून चालक अमोल दहिफळे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी आळे फाटा येथे हलवण्यात आले आहे. ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, माळशेज घाटात सध्या दाट धुके व पाऊस यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहे. खबरदारी म्हणून माळशेज मार्गाने होणारी वाहतूक दोन दिवसांठी बंद ठेवण्यात आली आहे.
अपघातात थोडक्यात बचावले बापलेक
शहादेव रामा दहिफळे आणि त्यांचा मुलगा अमोल दहिफळे हे दोघे कल्याण येथून कटलरी माल असलेला टेम्पो घेऊन नगरमार्गे जात होते. माळशेज घाटात पोहोचल्यानंतर तेथे जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे अमोल टेम्पो हळूहळू चालवित होतो. मात्र काही समजण्याच्या आतच गाडीवर दरडी कोसळली. यानंतर वेळीच हँडब्रेक दाबून दोघंही खाली उतरले. सुदैवानं दोघांचेही जीव वाचला. मात्र दरडीसहीत टेम्पो २५ ते ३० फूट खोली दरीत कोसळला.
माळशेज घाटात दरड कोसळून टेम्पोचा चक्काचूर, टेम्पोचालक जखमी