उजनी पाणलोट क्षेत्रात लाँच उलटली, तिघे जण बेपत्ता, बालकांसह महिलेचा समावेश, शोधमोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:32 PM2024-05-21T21:32:50+5:302024-05-21T21:33:21+5:30
Pune News: उजनी पाणलोट क्षेत्रातील कळाशी गावाकडून कुगावकडे जाणारी लाँच जोराच्या वाऱ्याने उलटल्यामुळे लाँचमधील चार जण बुडून बेपत्ता झाले. धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास कळाशी गावानजीकच्या भीमेच्या पात्रात घडली.
- शैलेश काटे
इंदापूर - उजनी पाणलोट क्षेत्रातील कळाशी गावाकडून कुगावकडे जाणारी लाँच जोराच्या वाऱ्याने उलटल्यामुळे लाँचमधील चार जण बुडून बेपत्ता झाले. धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास कळाशी गावानजीकच्या भीमेच्या पात्रात घडली. बेपत्ता झालेल्यांपैकी एक जण पोहत पाण्याबाहेर आला. बेपत्ता असणारांमध्ये एक महिला व बालकाचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे.
या संदर्भात लोकमत शी बोलताना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे म्हणाले की, उजनी पाणलोट क्षेत्रातील कळाशी गावाकडून कुगाव ( ता. करमाळा) कडे निघालेल्या लाँचमधून तीन पुरुष, एक महिला असे चौघेजण प्रवास करत असताना वादळी वाऱ्यामुळे लाँच उलटली. बुडालेल्यामधील एक जण पोहत पाण्याबाहेर निघाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभाग व पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरु आहे. दरम्यान, कळाशीचे सरपंच भोई यांनी या चौघांमध्ये एका बालकाचा ही समावेश असल्याची माहिती दिली.