पुणे लसीकरणात अव्वल! पहिला व दुसरा डोस मिळून आतापर्यंत तब्ब्ल '६० लाखांचा' टप्पा पार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 11:38 AM2021-08-02T11:38:35+5:302021-08-02T11:38:41+5:30
एकूण लसीकरणापैकी ४४ लाख ९५ हजार २१८ जणांनी पहिला, तर १५ लाख ९ हजार ४२४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे
पुणे : देशात महाराष्ट्र राज्याने लसीकरणाबाबतीत कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर राज्यात पुणे जिल्हा लसीकरणात अव्व्ल स्थानावर असून पहिला व दुसरा डोस मिळून आतापर्यंत ६० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात पुणे शहरातील २६ लाख ७७ हजार ३४४ जणांचा समावेश आहे. एकूण लसीकरणापैकी ४४ लाख ९५ हजार २१८ जणांनी पहिला, तर १५ लाख ९ हजार ४२४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपुढील सर्व व ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या नागरिकांचे, तिसऱ्या टप्प्यात सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांचे आणि चौथ्या टप्प्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु केले आहे.
मागील आठवड्यात जिल्ह्यात साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. पिंपरी चिंचवडमधील १० लाख ७८ हजार ३२४, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २२ लाख ४८ हजार ९७४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर, साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपुढील नागरिक आणि १८ ते ४४ वर्षे वयोगटातील मिळून एकूण ८५ लाख ३९ हजार ७०६ नागरिक कोरोना लसीकरणासाठी पात्र आहेत.
काहींचे एक तर काहींचे दोन डोस पूर्ण
आतापर्यंत १ लाख ५६ हजार ८८८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला, तर यापैकी १ लाख १३ हजार ८३४ जणांचे दोन्ही डोस झाले आहेत. २ लाख ५५ हजार २५९ फ्रंट लाइन वर्कर्सनी पहिला, तर यापैकी १ लाख ६२ हजार १८४ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. जिल्ह्यातील ९ लाख २५ हजार ९६७ ज्येष्ठ नागरिकांचा एक आणि यापैकी ५ लाख ५४ हजार २९४ ज्येष्ठ नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. ४५ ते ५९ वयोगटातील ११ लाख ४४ हजार ७७३ जणांचा पहिला तर, यापैकी सहा लाख ६३८ जणांचे दोन्ही डोस झाले आहेत.