पुणे : मुंढव्यातील मानवी वस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 10:58 AM2019-02-04T10:58:18+5:302019-02-04T11:07:10+5:30
मुंढव्यातील केशव नगर परिसरात सहा जणांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आले आहे. जवळपास तासाभराच्या थरारानंतर वन विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.
पुणे : मुंढव्यातील केशव नगर परिसरात सहा जणांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आले आहे. जवळपास तासाभराच्या थरारानंतर वन विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. या बिबट्याला आता कात्रजमधील प्राणी मदत केंद्रात नेण्यात येणार आहे.
नदी किनाऱ्याला लागून असलेल्या केशव नगर भागात सोमवारी(4 फेब्रुवारी) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बिबट्या रहिवासी वस्तीत शिरला. त्याने एका ७ वर्षाच्या मुलाला पकडले. या मुलाला वाचविण्यासाठी धावलेल्या आणखी तीन जणांवर बिबट्याने हल्ला केला. यानंतर लोकांच्या आरडाओरड्यामुळे बिबट्या बिथरला. यानंतर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या डक्टमध्ये बिथरलेला बिबट्या लपून बसला होता.
मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या ज्या इमारतीत लपला होता, त्या परिसरात वनाधिकाऱ्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. यानंतर जवळपास तासाभरानंतर बिबट्याला जाळीत पकडण्यात अधिकाऱ्यांना यश आहे.