Pune Local Train | आता शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार ४ लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 01:01 PM2023-02-07T13:01:58+5:302023-02-07T13:02:46+5:30
शिवाजीनगर स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्या...
पुणे : शिवाजीनगर रेल्वेस्थानकावरून पुणे-लोणावळालोकल सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून होत होती. पुणे रेल्वेस्थानकावर यार्ड रिमोल्डिंगचे काम सुरू असल्याने शिवाजीनगर स्थानकावरून लोकल सेवा चालवण्याशिवाय पुणे रेल्वे प्रशासनाकडे पर्यायदेखील नव्हता. यामुळे ही सेवा सुरू करण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सोमवारी लोकलसाठी उभारण्यात आलेल्या टर्मिनल आणि प्लॅटफॉर्मचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि सुनील कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी खासदार गिरीश बापट ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. काल दुपारी दीड वाजता पुणे ते तळेगाव या लोकलला हिरवी झेंडी दाखवून ही सेवा सुरू करण्यात आली. यामुळे आता शिवाजीनगर स्थानकावरून आणखी तीन लोकल धावणार आहेत. या मार्गावर एकूण ४ लोकल शिवाजीनगर येथून सुटणार असून, या सेवेचा मोठा फायदा चाकरमानी, विद्यार्थी आणि व्यापारी वर्गाला होणार आहे.
पुणे स्थानकावरून एकूण २० लोकल लोणावळ्यासाठी जात होत्या, त्यापैकी १ लोकल आधीपासून शिवाजीनगर येथूनच सुटत होती, त्यामुळे १९ पैकी ३ लोकल या शिवाजीनगर येथूनच सुटणार आहेत. उर्वरित १६ लोकल या पुणे-लोणावळा-पुणे या मार्गावर धावणार आहेत. या कार्यक्रमावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ मंडळ अभियंता विजयसिंह दडस, जोएल मैकेंजी, मनीष सिंह, गौरव बापट, शिवाजीनगर रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक संजय कुंभार, लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांची उपस्थिती होती.
विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या अनुपस्थितीने चर्चा
पुणेकरांसह अन्य लोकल प्रवाशांच्या हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सोमवारी मार्गी लागला. शिवाजीनगर येथून सुटणाऱ्या लोकलची संख्या अजून वाढणे गरजेचे आहे. मात्र, सुरुवातीला चार लोकल सुटणार असल्याने प्रवासी वर्गात आनंद आहे. खासदार गिरीश बापट यांच्या प्रयत्नामुळे ही सेवा सुरू झाली. या सेवेच्या उद्घाटनासाठी आमदार व इतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यामुळे रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांच्या समस्या, सुविधा याबाबत रेल्वे व्यवस्थापक फार गांभीर्याने घेत नसल्याची चर्चा सुरू होती.
शिवाजीनगर स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्या
शिवाजीनगर येथून पहिली लोकल सकाळी ०६:३५ वाजता सुटेल. यानंतर दुपारी ०५:१५, रात्री ०८:३५ आणि ०९:०५ अशा तीन लोकल सुटतील. (उर्वरित लोकल नियमित वेळेत पुणे स्थानकावरून सुटतील.)
लोणावळा स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्या
लोणावळा येथून पहिली लोकल दुपारी ०३:३० वाजता सुटेल. यानंतर संध्याकाळी ०७:००, ०७:३५ आणि रात्री १०:३५ अशा तीन लोकल सुटतील.