Pune News | पुण्याची लोकल अजूनही 'निर्बंधां'च्या ट्रॅकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 02:10 PM2022-04-02T14:10:06+5:302022-04-02T14:11:56+5:30
लोकल, डेमू तसेच जनरल तिकिटांना अद्यापही कोरोनाचे निर्बंध लागू...
पुणे :पुणे-लोणावळादरम्यान धावणाऱ्या लोकल, डेमू तसेच जनरल तिकिटांना अद्यापही कोरोनाचे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे केवळ दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. राज्य सरकारने याबाबत रेल्वेला कोणताच आदेश दिला नसल्याने रेल्वेदेखील जुन्या नियमांची अंमलबजावणी करीत आहे, त्यामुळे प्रवासी व तिकीट केंद्रावरील कर्मचारी यांच्यात वाद होत आहेत.
पुणे-लोणावळा लोकल असो अथवा पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या इंटरसिटी दर्जाच्या गाड्या असो त्यांना देण्यात येणारे अनारक्षित तिकीट केवळ दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच दिले जात आहे. यात सिंहगड, डेक्कन क्वीन, डेक्कन, इंद्रायणी व पुणे-मुंबई इंटरसिटी या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना अनारक्षित तिकीट हवे असेल तर प्रवाशांना दोन डोस झालेले प्रमाणपत्र अजूनही दाखवावे लागत आहे. तेव्हाच त्यांना जनरल व लोकलचे तिकीट दिले जात आहे. राज्य सरकारकडून नवे आदेश प्राप्त न झाल्याने रेल्वेकडून जुनेच निर्बंध लागू आहेत. ते तत्काळ हटवले पाहिजेत. विना लस घेतलेल्या प्रवाशांनादेखील प्रवास करता आला पाहिजे.
लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज :
पुणे- लोणावळादरम्यान रोज लोकलच्या जवळपास २० फेऱ्या होतात. त्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. सकाळी दहा वाजताची लोकल गेल्यानंतर दुपारी तीन वाजताच पुण्याहून लोकल आहे. पूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान रोज ४२ लोकलच्या फेऱ्या होत होत्या. आता त्या सेवा पूर्ववत झाल्या पाहिजेत.
पुणे-लोणावळादरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. पूर्ण निर्बंध हटविल्यानंतर तिकिटांवरचे देखील निर्बंध काढले पाहिजे.
- मयुरेश झव्हेरी, सदस्य, पिपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटना.
राज्य सरकारने जरी सर्व प्रकारचे निर्बंध हटविले असले तरी रेल्वेसेवेबाबत कोणतेच सुधारित आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. जसे आदेश प्राप्त होतील, त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे.