Pune Lockdown : पुणेकरांनो, ऐकलंत का? सर्व कामं सकाळी ११ च्या अगोदर उरका; दुपारपासून लॉकडाऊन होणार आणखी कडक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 08:36 PM2021-05-10T20:36:04+5:302021-05-10T20:36:22+5:30
नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडावे. दुपारी १२ वाजल्यापासून रस्त्यावर येणार्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे.
पुणे : पुण्यात राबविण्यात येत असलेल्या लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. असे असले तरी अजूनही ही संख्या खूप कमी झालेली नाही. त्यामुळे शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक होणार आहे. त्यामुळे लोकांनी महत्वाची कामे असतील तर ती सकाळी ११ वाजण्याच्या आतच पूर्ण करावी. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून लॉकडाऊनची आणखी कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
पुण्यात लॉकडाऊन करण्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने नुकतीच राज्य शासनाला केली होती. त्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या चर्चेत आली आहे. संपूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ येण्यापूर्वीच आधीच खबरदारी घ्यावी, या हेतूने शहर पोलिसांनी आता नाकाबंदीची व्याप्ती वाढविली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता तसेच सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे व इतर वरिष्ठ अधिकारी स्वत: रस्त्यावर उतरुन दररोज शहरातील विविध भागाला भेटी देऊन नाकाबंदीची पाहणी करीत आहेत. उत्तमनगर, स्वारगेटसह शहरातील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पाहणी केली. सर्वत्र नाकाबंदी चांगली सुरु आहे. काही ठिकाणी बंदोबस्तात काही उणिवा दिसून आल्या. त्याबाबत त्यांनी सूचना केल्या. सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना मोकळीक दिली आहे. असे असले तरी नागरिकांनी आपल्या परिसरातच वाहनांचा वापर कमीत कमी करावा. सकाळी नागरिक वेगवेगळी कारणे सांगत असतात. त्यातून रस्त्यावर पोलीस आणि नागरिक यांच्यात काही वेळा वादाचे प्रसंगही येत असताना दिसून येतात. दुपारपासून रस्त्यावर आलेल्या प्रत्येक नागरिकांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
.....
नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडावे. दुपारी १२ वाजल्यापासून रस्त्यावर येणार्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त पुणे शहर