Girish Bapat | "गिरीशभाऊंसाठी मी आणले हजवरून पवित्र पाणी"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 01:46 PM2023-03-30T13:46:52+5:302023-03-30T13:57:50+5:30
एखादा लोकप्रतिनिधी कार्यकर्त्याला कसा जपतो त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे गिरीश बापट...
- राजू इनामदार
पुणे :पुणे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गिरिश बापट यांचे काल (२९ मार्च) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पुण्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया राजकीय नेत्यांकडून आणि सामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बापट हे जसे उत्तम लोकप्रतिनिधी होते तसे ते मैत्री निभावण्यातही अव्वल होते. रिक्षाचालकापासून ते मनपातील कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अनेक मित्रांपैकी एक असणारे पुण्यातील कादरभाई युसूफ शेख. शेख आणि बापट यांची सन १९८३ च्या आधीपासूनची मैत्री होती.
या मैत्रीवर बोलताना शेख म्हणाले, भांडारकर रस्त्यावर माझे काही मित्र होते. प्रकाश बाहेती व अन्य काही. त्यावेळी गिरीशभाऊंनी नुकतीच कामाला सुरुवात केली होती. पोटनिवडणुकीसाठी ते उभे होते. मित्र म्हणाले, चला, आपण गिरीश बापट यांचे काम करू यात. केले काम. पोस्टर लावणे, मतदारांना भेटणे अशी ती कामे. आम्ही उत्साहाने करत होतो. त्या निवडणुकीत गिरीशभाऊ निवडून आले. आल्यानंतर त्यांनी मला विचारले, तुला काय हवे. मी त्यावेळी कुशनचे काम करायचो. मला जागा हवी होती. एक जागा होती. ती पाहिली, पण त्याचे पैसे बरेच होते. त्यामुळे काही जमले नाही. आणखी एक जागा पाहिली, तोही व्यवहार फिसकटला. मी थोडा नाराज झालो.
नंतर भाऊ शिवाजीनगरमधून नगरसेवक झाले. आमच्यापासून लांब गेले; पण आम्ही सगळेच त्यांच्याबरोबर आठवणीत होतो. त्यांनी तिथे बोलावून घेतले. माझ्या जागेचेही त्यांच्या लक्षात होते. मला त्यांनी विचारले, काय झाले? जागा मिळाली की नाही? मी ‘नाही’ असे सांगितले. त्यानंतर, त्यांनी मग मला एक जागा मिळवून दिली. त्याचे पैसे त्यांनीच दिले. मी कुशन तयार करायचे काम तिथे सुरू केले. इतके करणारा कोणी नेता असेल का मला सांगा. तेव्हापासून ते मला ‘शेखबाबा’ म्हणायला लागले. माझा प्रपंच व्यवस्थित सुरू झाला, असंही शेख यांनी सांगितले.
पुढे बोलताना शेख म्हणाले, आमचे मग कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले. मी हजला चाललो होतो. त्यांना सांगायला गेलो, तर त्यांनीच मला तिथून पवित्र जमजमचे पाणी व खजूर आणायला सांगितले. मी आणले. त्यांच्या घरी गेलो. त्यांना दिले. त्यांची पत्नी व त्यांनी माझ्यासमोर ते पवित्र पाणी घेतले. खजूर खाल्ले, प्रेमाने विचारपूस केली. प्रवासादरम्यानचे अनुभव विचारले. मला सांगा, असे वागणाऱ्या नेत्याला कधी कोणी सोडेल का? त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत मी त्यांच्याबरोबर असायचो. कसब्यातील आमदारपदापासून ते आता खासदार होईपर्यंत. त्यांच्या जाण्याने मला झालेले दु:ख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझ्या कुटुंबातीलच एक जण गेल्याची फक्त माझीच नाही, तर माझ्या कुटुंबीयांचीही भावना आहे.
मुस्लीम बांधवांकडून नमाजपठण :
खासदार गिरीश बापट यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवलेले असताना मुस्लीम बांधवांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले, तसेच तेथे नमाज पठण करून बापट यांच्याविषयीची आत्मीयता व्यक्त केली.