Pune Lok Sabha Result 2024: लाेकसभेची निवडणूक फिरली स्थानिक मुद्यावर; पुणेकरांच्या संमिश्र भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 11:29 AM2024-06-07T11:29:52+5:302024-06-07T11:31:29+5:30

निकालानंतर तरी कुठे काय चुकले, हे पाहणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करत आहेत; तर काहींनी भाजप पुन्हा सत्तेत आले हेच समाधानकारक आहे, अशी भावना व्यक्त केली आहे....

Pune Lok Sabha Result 2024 elections revolved around local issues; Punekars have mixed feelings | Pune Lok Sabha Result 2024: लाेकसभेची निवडणूक फिरली स्थानिक मुद्यावर; पुणेकरांच्या संमिश्र भावना

Pune Lok Sabha Result 2024: लाेकसभेची निवडणूक फिरली स्थानिक मुद्यावर; पुणेकरांच्या संमिश्र भावना

पुणे : लाेकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपला चांगला धडा शिकविला आहे. धर्माचा, श्रद्धेचा मुद्दा चालला नाही. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बरोबर घेणे सामान्यांना रुचले नाही. यातही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा निकाल धक्कादायक होता. या पार्श्वभूमीवर लाेकसभा निवडणूक निकालाबाबत ‘लाेकमत’ने पुणेकरांच्या भावना जाणून घेतल्या. निकालानंतर तरी कुठे काय चुकले, हे पाहणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करत आहेत; तर काहींनी भाजप पुन्हा सत्तेत आले हेच समाधानकारक आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आहे. बोर्डात येणारे मूल केवळ उत्तम मार्क्स मिळून पास झाले, असे काहीसे झाले आहे. भाजप हे सगळ्यात अग्रेसर असणार हे तर माहीतच होते; पण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा निकाल धक्कादायक होता. कुठे काय चुकले हे पाहणे गरजेचे आहे. सत्तेत भाजपच आले हे समाधानकारक आहे. भाजपच्या राज्यात सुरक्षित वाटते.

- अमृता देशपांडे, गृहिणी

सत्तेत कुणीही येवो काही फरक पडत नाही; पण जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. जनतेचे प्रश्न सोडून धर्म, जात या मुद्यावर निवडणुका लढविल्या जातात तेव्हा नक्की चाललंय काय? असा प्रश्न पडतो. सामान्यांना भेडसावणारे महागाई, बेरोजगारी, पाणी हे मुद्दे घेऊनच निवडणुकीत उतरणे आवश्यक आहे. भविष्यात खासदारांनी सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच काम करणे अपेक्षित आहे.

- सुनीता रमेश पांढरे, गृहिणी

सत्ताधाऱ्यांना जनतेने चांगलाच धडा शिकविला आहे. जनतेने काँग्रेसला हात दिला, तर भाजपला काठावर पास केले. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी तसे म्हटले तर आशादायी चित्र आहे. यापुढील निवडणुकीत स्थानिक मुद्देच महत्त्वाचे ठरणार आहेत. गावागावांमध्ये लोकप्रतिनिधींनी काय काम केले यावरच भविष्यात पक्षांचे मूल्यमापन केले जाणार आहे, असा इशारा जनतेने या निवडणुकीतून दिला आहे.

- सोमनाथ राऊत, चार्टर्ड अकाउंटंट

महाराष्ट्रात ज्या पद्धतीने फोडाफोडीचे राजकारण झाले, तेच मुळात जनतेला पटले नाही. नेत्यांची दमदाटी, पैशाचा माज, उन्माद सत्ताधाऱ्यांमध्ये वाढला होता. राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी सारखे घेतलेले मुद्देच योग्य होते. हे जनतेला पटले. आज गरीब आणि श्रीमंत अशी दरी वाढली आहे. ती कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

- जीवन निवृत्ती चाकणकर, शेतकरी

काहीही म्हणा मोदी की गॅरंटीला धक्का लागला. विरोधी पक्षालाही चान्स मिळाला. एकाधिकारशाही चालणार नाही हे मतदारांनी दाखवून दिले आणि लोकशाहीला मजबूत केले.

- अरुणा उदय माने, गृहिणी

निवडणुका म्हटले की चढ-उतार येतातच. म्हणून मतदार दुरावत नाहीत. भाजपचा एक पारंपरिक वर्ग आहे. भाजपचा ४०० पारचा नारा यशस्वी झाला नसला तरी २४० जागा मिळाल्या आहेत. म्हणजे निम्मी जनता मोदी यांच्याबरोबर आहे. तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान होतील, याची आम्हाला खात्री आहे.

- केतकी पाध्ये

आता मतदार जागृत झाला आहे. लोकप्रतिनिधी चुकला तर मतदार चुका दाखवून देतात. मतदारांना गृहीत धरता येत नाही. तरीही लोकांच्या मनावर मोदींनी घेतलेली पकड कमी झालेली नाही. चुका सुधारून पुन्हा सत्तेत आले तर जनता नक्कीच स्वीकारेल.

- प्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक

Web Title: Pune Lok Sabha Result 2024 elections revolved around local issues; Punekars have mixed feelings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.