Pune Lok Sabha Result 2024: पुण्यात मुरलीधर माेहाेळ विजयाच्या वाटेवर; लीड तोडणे धंगेकरांसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 03:02 PM2024-06-04T15:02:31+5:302024-06-04T15:03:06+5:30
Pune Lok Sabha Result 2024: पहिल्या ३-४ फेऱ्यांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी लीड मिळवला पण त्यानंतर मोहोळ पुढील सगळ्या फेऱ्यांमध्ये लीड मिळवत अखेर विजयाचे वाटेवर असल्याचे दिसू लागले
Pune Lok Sabha Result 2024 : देशभरात चर्चा होण्यासारखी अटीतटीची लढत पुणे लोकसभेत पाहायला मिळत आहे. महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांच्या विरुद्ध महविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (ravindra dhangekar) यांच्यात सामना रंगताना दिसतोय. अकराव्या फेरीअखेरील मतमाेजनीनंतर पुण्यात मुरलीधर माेहाेळ यांनी तब्बल ६५ हजारांनी लीड घेतले आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे. सुरवातीला भाजपचे उमेदवार मुरलीधर माेहाेळ आणि काॅंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली हाेती. त्यामुळे, नक्की विजय काेणाचा हाेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. परंतू, आता माेहाेळ यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
माेहाेळ हे दुस-या फेरीत १२ हजारांनी आघाडीवर हाेते. त्यानंतर प्रत्येक फेरीत त्यांचे लीड हे पाच ते सात हजारांनी वाढत गेले. आता फेरीनंतर यांनी सुरवातीपासून मतमाेजणीत आघाडी घेतली आणि अकराव्या फेरीअखेर माेहाेळ यांनी तब्बल ६५ हजारांचे लीड घेतल्याने हे लीड ताेडणे धंगेकर यांच्यापुढे आव्हान आहे.
पुण्यात मोहोळ, धंगेकर आणि वसंत मोरे या तिघांमध्ये लढत होती. परंतु धंगेकर आणि मोहोळ यांची चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. सुरुवातीपासून दोघानाही जिंकण्याची गॅरन्टी होती. परंतु विधानसभा निहाय मतदानात मोहोळ यांना जास्त मते मिळाल्याचे दिसून आले. पहिल्या ३-४ फेऱ्यांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी लीड मिळवला होता. पण त्यानंतर मोहोळ पुढील सगळ्या फेऱ्यांमध्ये लीड मिळवत अखेर विजयाचे वाटेवर असल्याचे दिसू लागले आहे.