Pune Lok Sabha 2024: ना गुलालाची खरेदी, ना पेढ्यांची बुकिंग! निकालाबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, उत्सुकता शिगेला
By अजित घस्ते | Published: June 3, 2024 08:07 PM2024-06-03T20:07:48+5:302024-06-03T20:10:40+5:30
पुण्यात महायुतीचा विजय हाेईल की महाविकास आघाडीचा? खात्री नसल्याने कार्यकर्त्यांकडून चौकशी होतीये, खात्रीशीर बुकिंग केली जात नाही
पुणे: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होत आहे. पुण्यात महायुतीचा विजय हाेईल की महाविकास आघाडीचा? याबाबत संभ्रम असल्याने मिठाई, गुलाल, फेटे, विजयी पट्टी खरेदीसाठी यंदा अपेक्षित ऑर्डर दिली गेली नसल्याचेच काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
प्रत्येक वेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक गुलालाची ॲडव्हान्स बुकिंग करत असे. पूर्वी ५० ते १०० पोती गुलालाची ऑर्डर दिली जात होती. यावर्षीची लोकसभा निवडूक चुरशीची झाल्याने विजयाची खात्री नक्की कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे यंदा गुलालाची अपेक्षित खरेदी झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी फेट्यांची ऑर्डर दिली आहे, जल्लाेष करण्यासाठी लागणारे उपरणे, फेटे, विजयी पट्यांची अपेक्षित खरेदी केली नाही. निकाल लागल्यानंतर अचानक गर्दी हाेईल, असेही काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
फक्त चौकशी; खरेदी नाही
गुलालाचे व्यापारी दीपक अग्रवाल म्हणाले की, पूर्वी विजयाची खात्री असलेल्या पक्षातील उमेदवारांचे कार्यकर्ते १०० ते २०० पोती गुलाल खरेदी करीत होते. यंदा मात्र नक्की विजय कोणाचा होणार? याची खात्री नसल्याने गुलाल खरेदीसाठी फक्त चौकशी करून जात आहेत. खात्रीशीर बुकिंग केली जात नाही.
शहरात मिठाई, पेढे तयार
संभाव्य विजयी उमेदवारांकडून निकालापूर्वीच मिठाई, पेढे खरेदीची ऑर्डर दिली जाते. यंदा मात्र अपेक्षित ऑर्डर आलेली दिसत नाही, असे मिठाईच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.