पुणे : सोशल मीडियामुळे हरवलेली आई मिळाली, दीड महिन्यानंतर कुटुंबियांशी भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 02:49 PM2018-02-15T14:49:12+5:302018-02-15T14:50:21+5:30
फेसबुक युजरच्या सतर्कतेमुळे कुटुंबापासून दुरावलेली आईची महिनाभरानंतर मुलांशी भेट...
बारामती : अलीकडे सोशल मिडीयावर व्हारल होत असलेल्या पोस्टमुळे याबाबत टीकेचा स्वर उंचावत असताना यामुळे काही चांगल्या गोष्टीही घडतात. एका फेसबुक युजर डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे कुटुंबापासून दुरावलेली आईची महिनाभरानंतर मुलांशी भेट झाली. त्या ज्येष्ठ महिलेचा तिचे कुटुंबीय दीड महिन्यांपासून शोध घेत होते.
निर्मला नामदेव फुले (वय ५६, रा. माळेवाडी अकलुज, ता.माळशिरस, जि सोलापूर) असे या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्या त्यांच्या घरातून २८ डिसेंबर २०१७ ला निघून गेल्या होत्या. त्यानंतर निर्मला यांचा कुटुंबियांनी शोध घेतला. मात्र, त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलाने फेसबुकवर पोस्ट केली. यात आईचे वर्णनासहित छायाचित्र टाकले होते.
भवानीनगर (ता.इंदापूर) येथील डॉ. महेश सदाशिव अंकुशे यांचा राजुरी (ता.पुरंदर) येथे दवाखाना आहे. ते रविवारी (दि.११) दौंड येथे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी गेले होते. परतीच्या वाटेवर केडगाव (ता.दौंड) येथे त्यांना एक महिला दिसली. त्यांना सदर महिलेस कुठेतरी पाहिल्याचा भास झाला. त्यांचे छायाचित्र फेसबुकवर पाहिल्याचे पुसटसे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचे फेसबुक अकाउंट चाळले. त्यावेळी निर्मला यांच्याबाबत त्यांना माहिती मिळाली. त्यांनी फेसबुक वरील फोटो व सदर महिलचे वर्णन जुळवले असता त्याच आहेत, असे लक्षात आले. त्यांनी निर्मला यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. निर्मला यांचे छायाचित्र त्यांच्या मुलाच्या व्हॉट्सअपवर पाठविले. त्यानंतर ‘ही आमचीच आई आहे, आम्ही तिला न्यायला येतो, असे त्यांनी डॉ अंकुशे यांना मोबाईलवर कळविले. त्यानंतर डॉ. अंकुशे यांनी चार तास त्यांच्यावर लक्ष ठेवत कुटुंबियांची वाट पाहिली. त्यानंतर निर्मला यांचे पती, मुलगा डॉ. निलेश फुले, त्यांची मुलगी, जावई आदी नातेवाईक त्या ठिकाणी पोहचले. जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर हरवलेल्या आईला पाहून फुले भावंडांना अश्रू अनावर झाले. फुले कुटुंबिय निशब्द झाले होते. दुरावलेल्या मायलेकांची भेट पाहुन डॉ .अंकुशे यांच्यासह उपस्थितांचे देखील डोळे पाणावले.
...‘सोशल मिडीया इज ग्रेट’
निर्मला यांचे चिरंजीव डॉ. निलेश फुले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, ‘सोशल मिडिया इज ग्रेट’. एक महिन्यापूर्वी माझी आई तिच्या भोळसर स्वभावामुळे निघून गेली होती. आम्ही महिनाभर तिचा शोध घेत होतो. पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिली होती. तिचा शोध लागत नसल्याने आम्ही सर्वजण तणावात होतो. शेवटी सोशल मिडीयाच्या प्रभावामुळे सुरवातीला व्हॉट्सअप आणि नंतर फेसबुकवर तिचे छायाचित्र, माहिती पोस्ट केली. अखेर सोशल मिडीयामुळे आमच्या आईची भेट झाली.