पुणे : ई-लर्निंगवर मराठीचे धडे , महापालिकेचा पुढाकार : दोनशे तज्ज्ञांची यादी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 05:51 AM2018-01-25T05:51:43+5:302018-01-25T05:52:08+5:30
इतिहास, भूगोल अशा शालेय अभ्यासक्रमातील विषयांपासून स्पर्धा परीक्षा, संशोधन यासाठी लागणारी माहिती इंटरनेटवर इंग्रजी भाषेमध्ये सहज उपलब्ध होते; मात्र हीच माहिती मराठीतून शोधायची झाल्यास अत्यल्प पर्याय उपलब्ध आहेत; मात्र आता कोणत्याही विषयाचे ज्ञान मराठी भाषेतून ई-लर्निंगच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीने यासाठी पुढाकार घेतला असून, वेब पोर्टल तयार केले जाणार आहे. यासाठी विविध क्षेत्रांतील २०० तज्ज्ञांची यादी तयार करण्यात आली आहे. तज्ज्ञांकडून दृकश्राव्य पद्धतीने विषयाचे आकलन करून घेता येईल.
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : इतिहास, भूगोल अशा शालेय अभ्यासक्रमातील विषयांपासून स्पर्धा परीक्षा, संशोधन यासाठी लागणारी माहिती इंटरनेटवर इंग्रजी भाषेमध्ये सहज उपलब्ध होते; मात्र हीच माहिती मराठीतून शोधायची झाल्यास अत्यल्प पर्याय उपलब्ध आहेत; मात्र आता कोणत्याही विषयाचे ज्ञान मराठी भाषेतून ई-लर्निंगच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीने यासाठी पुढाकार घेतला असून, वेब पोर्टल तयार केले जाणार आहे. यासाठी विविध क्षेत्रांतील २०० तज्ज्ञांची यादी तयार करण्यात आली आहे. तज्ज्ञांकडून दृकश्राव्य पद्धतीने विषयाचे आकलन करून घेता येईल.
मराठीतील मान्यवर लेखकांची माहिती, त्यांचे साहित्य याबाबतही दृकश्राव्य पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. व्हिडिओ लायब्ररी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञांची यादी करण्यात आली आहे. यासाठी महानगरपालिकेतर्फे खासगी स्टुडिओशी संपर्क साधून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे. स्टुडिओमध्ये संबंधित व्यक्तीचे दहा मिनिटांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याचे संकलन, संपादन करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओंचे एकत्रीकरण करून महानगरपालिकेतर्फे व्हिडिओ लायब्ररी तयार करण्यात येत आहे. ही लायब्ररी ई-लर्निंगच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न होत असताना लहान मुले, तरुण पिढीमध्ये मातृभाषेची गोडी निर्माण होऊन अभिरुची वृद्धिंगत व्हावी, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत नोंदवण्यात येत आहे. शालेय अभ्यासक्रमातील विविध विषय, संशोधक, अभ्यासकांना मराठीतून ई-लर्निंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मराठी भाषा संवर्धन समितीतर्र्फे हाती घेण्यात आला आहे.
‘आजकालच्या मुलांचा मराठीकडील ओढा कमी होत चालला आहे, असे बोलले जाते. प्रत्यक्षात एखाद्या अवघड विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना, विशेषत: स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाही. व्हिडिओ लायब्ररीच्या माध्यमातून त्यांना विविध विषयांचे ज्ञान मान्यवरांकडून सोप्या शब्दांत जाणून घेता येणे शक्य होणार आहे’, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
स्वयंअध्ययनासाठी वेब पोर्टल -
शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांना नव्याने शिक्षण देणे, स्वयंअध्ययनासाठी वेब पोर्टल सुरू करून यावर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. या अॅडॉप्टिव्ह लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमवर अभ्यासक्रमाचे, विविध क्षेत्रांतील माहितीचे व्हिडिओ प्रसारित केले जाणार आहेत.
सुरुवातीच्या टप्प्यात मान्यवर लेखकांची माहिती, त्यांचे साहित्य याबाबत मुलांना, वाचकांना दृकश्राव्य माध्यमातून माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी आकाशवाणीचा एक स्लॉट घेण्यात आला आहे. पुढील टप्प्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मराठी भाषेतून ज्ञान उपलब्ध करून दिले
जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या जमान्यात वेब पोर्टलच्या माध्यमातून
ई-लर्निंगवर भर दिला जाईल. - मुक्ता टिळक, महापौर