व्यवसायाने नाभिक असलेला डेबेबे ठरला पुणे मॅरेथॉनमध्ये चॅम्पियन!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 02:28 AM2018-12-03T02:28:24+5:302018-12-03T02:28:32+5:30
इथिओपियाच्या अॅटलॉ डेबेबे याने रविवारी पुणे मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या मुख्य शर्यतीत विजेतेपद पटकावले.
पुणे : इथिओपियाच्या अॅटलॉ डेबेबे याने रविवारी पुणे मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या मुख्य शर्यतीत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, व्यवसायाने नाभिक असलेल्या ३३ वर्षीय डेबेबे याने आपल्या देशाबाहेर जिंकलेली ही पहिलीच स्पर्धा ठरली. हा पराक्रम त्याने देशाबाहेर सहभागी झालेल्या पहिल्याच स्पर्धेत केला. महिलांच्या मुख्य शर्यतीतील विजेती केनियाची पास्कालिया चेपकोगेई हिचा अपवाद वगळता विदेशी गटातील सर्व शर्यतींत पहिले तिन्ही क्रमांक इथिओपियाच्याच खेळाडूंनी पटकाविले.
सणस मैदानापासून सुरू झालेली ४२.१९५ किलोमीटर अंतराची मुख्य शर्यत डेबेबे याने २ तास १७ मिनिटे १७ सेकंद अशी वेळ देत जिंकली. गतविजेता इथिओपियाच्याच गुजशू बेशा याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने २ तास १८ मिनिटे ७ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. इथिओपियाचा असेफा बेकेले अबेले (२ तास १८ मिनिटे ३८ सेकंद) तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
८ वर्षांच्या कालखंडानंतर यंदा झालेल्या महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये बाजी मारणाºया चेपकोगेई हिने २ तास ५० मिनिटे २७ सेकंदांची वेळ दिली. ४ वर्षीय मुलांची आई असलेल्या चेपकोगेई हिचा पतीदेखील धावपटू आहे. त्याने यंदा फेब्रुवारीत हैदराबादमध्ये झालेली मॅरेथॉन जिंकली होती. भारतात आतापर्यंत अनेक शर्यतींत सहभागी झालेली चेपकोगेई मागील वर्षी या स्पर्धेत तिसरी आली होती. बेलेव एसार मेकॉनेन आणि फेकेडे सिमेन तिलाहून या इथिओपियाच्या खेळाडूंनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला.
२१.०९८ किलोमीटर अंतराच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीत पुरुषांच्या गटामध्ये इथिओपियाच्या डेकेबे मिटकू तफा याने १ तास ३ मिनिटे
५६ सेकंद वेळ देत बाजी मारली. ही शर्यत १ तास १९ मिनिटे ०९ सेकंद वेळेत पूर्ण करणारी इथिओपियाचीच डेगेफा डिबिबे गेझमू महिला गटामध्ये अव्वल ठरली.
पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे चेअरमन, माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते पहाटे ५ वाजता मुख्य शर्यत सुरू करण्यात आली. पॅरालिम्पिकपटू मुरलीकांत पेटकर, खासदार वंदना चव्हाण, मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल अॅण्ड डेपोचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आर. के. बन्सल, आयजीपी कृष्णप्रकाश, पुणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय दामले, कुलदीप सोनी, कविता नंदी या वेळी
उपस्थित होते.
कलमाडी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. या वेळी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्त अॅड. अभय छाजेड, मुरलीकांत पेटकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, धनंजय दामले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.