पुण्याच्या बाजारपेठेत मटारचे दर ४ हजारांनी उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 11:39 AM2018-11-20T11:39:43+5:302018-11-20T11:40:40+5:30
भाजीपाला : गेल्या आठवड्यात बाजारात मटारची आवक केवळ दोन ट्रक झाली होती.
पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मटारची आवक वाढल्याने मटारच्या दरात क्विंटलमागे गेल्या आठवाड्याच्या तुलनेत तब्बल ४ हजार रुपयांनी घट झाली आहे. तसेच आवक वाढल्याने कांद्याच्या दरातही घट झाली असून, भेंडीच्या दरात वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात बाजारात मटारची आवक केवळ दोन ट्रक झाली होती. त्यामुळे मटारला क्विंटलला ६००० ते ९००० दर मिळाला. मात्र, सोमवारी (दि.१९) दहा ट्रक आवक झाल्याने मटारला ४००० ते ५००० हजार दर मिळाला. गेल्या आठवड्यात कांद्याला ७०० ते १६०० रुपये दर मिळाला तर सोमवारी ५०० ते १३०० रुपये भाव मिळाला. टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असून, टोमॅटोला एका क्विंटलला ४०० ते ७०० रुपये भाव मिळाला. तर हिरव्या मिरचीला एका क्विंटलला १००० ते २००० रुपये दर मिळाला. वांग्याला क्विंटलला १००० ते २५०० रुपये दर मिळाला.