पुण्याच्या बाजारी सिमला सफरचंद, तैवानी पेरू अन् पुरंदरची सीताफळं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:27+5:302021-08-18T04:15:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डात हिमाचल प्रदेशातील सिमला येथून सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. यंदा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्डात हिमाचल प्रदेशातील सिमला येथून सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. यंदा सिमला सफरचंदाचे पीक जास्त झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सफरचंदाचे दर उतरलेले आहेत. सीताफळाची आवकदेखील जास्त आहे. तैवान येथील गुलाबी पेरूची चांगली आवक असून, ३५ ते ५५ रुपये प्रतिकिलो दर त्यांना मिळत आहे. प्रतवारीनुसार डाळिंब, मोसंबी या फळांनाही मागणी आहे.
सिमला सफरचंदाची रोज पाच ते सहा हजार खोकी आवक पुण्यात सुुरू झाली आहे. मालाच्या प्रतवारीनुसार दीड हजार रुपये ते तीन हजार रुपये एका खोक्याचा दर आहे. एका खोक्यात सुमारे २५ ते ३० किलो सफरचंदे आहेत. यंदा हिमाचल प्रदेशात सफरचंदाचे चांगले पीक आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सफरचंदाचे दर उतरलेले आहेत. गेल्या वर्षी याच वेळेस दोन हजार ते चार हजार रुपये प्रतिखोका दर होता. मालाची आवक अजून वाढणार असल्याने दर अजून उतरण्याची शक्यता आहे. सफरचंदाचा हंगाम जुलैच्या शेवटच्या हप्त्यापासून नोव्हेंबरपर्यंत चालतो.
बाजारामध्ये सीताफळाची आवक देखील जास्त होत आहे. साधारण १५ ते २० टन इतका माल बाजारात येत आहे. मालाच्या प्रतवारीनुसार किलोस १० रुपये ते १३० रुपये रेट मिळत आहे. तैवान येथील पेरूला (गुलाबी) ३५ ते ५५ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. सरदार पेरु २०० ते ५०० रुपये प्रति क्रेट विकला जात आहे. गुलाबी पेरुची आवक २०० ते ३०० क्रेट आहे. तसेच सरदार पेरूची आवक ४०० ते ५०० क्रेट आहे. मागणीदेखील वाढत आहे. पपई मागणी चांगली आहे. दर प्रतिकिलोस ८ ते २५ रुपये मिळत आहे.
फोटो : १) हिमाचल प्रदेश येथील सिमला येथून सफरचंदाची पुणे मार्केट यार्डात प्रचंड आवक झाल्याने दर उतरले आहेत.
२) तैवान येथील पेरूची मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.