पुण्याची होऊ शकते पाण्यातील मुंबई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 06:24 AM2017-09-01T06:24:05+5:302017-09-01T06:24:09+5:30
शहराच्या मध्यभागातील तसेच उपनगरांमधीलही पावसाळी गटारे खराब झालेली असून, त्याकडे लक्ष दिले नाही व मुंबईसारखाच पाऊस झाला तर पुण्याची मुंबई होण्यास वेळ लागणार नाही
पुणे : शहराच्या मध्यभागातील तसेच उपनगरांमधीलही पावसाळी गटारे खराब झालेली असून, त्याकडे लक्ष दिले नाही व मुंबईसारखाच पाऊस झाला तर पुण्याची मुंबई होण्यास वेळ लागणार नाही, अशी टीका नगरसेवकांकडून होत आहे. महापालिका आयुक्तांनी संपूर्ण शहराचा पावसाळी गटारांचा आराखडा तयार करण्याची
घोषणा केली होती; मात्र त्यादृष्टीने प्रत्यक्षात अद्याप काहीही हालचाल झालेली नाही.
मध्य पुण्यात साधारण साडेचारशे किलोमीटर अंतराची गटारे आहेत. ती सर्व जुनी झाली आहेत. त्यांची क्षमता वाढवण्याची गरज आहे. मात्र त्याकडे प्रशासनाने कधी लक्षच दिलेले नाही. नगरसेवकांकडूनही प्रभाग विकास निधीमध्ये गटारीची कामे केली जातात. मात्र ही कामे, आहे तेच गटार उखडणे व आहे तसेच पुन्हा बांधणे या प्रकारची असतात. पाऊस जास्त पडला तर तिथे थेट घरांमध्ये पाणी शिरण्याचे अनेक प्रकार मागील वर्षी झाले आहेत. काँक्रिटच्या रस्त्यांवरची गटारे रस्त्याला समतल अशी केली आहेत. मात्र त्यावरच्या जाळ्यांमधून त्यात कचरा जाऊन ती तुंबण्याचे प्रकार वाढत आहेत.
नगरसेवक दीपक मानकर यांनी महापौर मुक्ता टिळक, आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदन देत ही सर्व स्थिती कळवली असून, गटारीसंबंधी त्वरित धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.