Pune Metro:पहिल्याच दिवशी १८ हजार पुणेकरांनी केला प्रवास; ५ तासात तब्बल साडेचार लाखांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 09:02 PM2022-03-06T21:02:35+5:302022-03-06T21:05:30+5:30
सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दुपारी ३ वाजता दोन्ही शहरांमधील मेट्रो व्यावसायिक तत्वावर सुरू करण्यात आल्या
पुणे : मेट्रोचे आजच्या एका दिवसातील फक्त ५ तासांचे उत्पन्न ४ लाख ६६ हजार ४६० रूपये झाले. वनाज ते गरवारे व पिंपरी ते फुगेवाडी या दोन मार्गांवर मिळून १८ हजार ६६५ जणांनी प्रवास केला.
सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दुपारी ३ वाजता दोन्ही शहरांमधील मेट्रो व्यावसायिक तत्वावर सुरू करण्यात आल्या. रात्री ८ वाजता फेऱ्या बंद झाल्या. या ५ तासात वनाज ते गरवारे या मार्गावर दोन्ही बाजूंनी १४ हजार २५१ जणांनी प्रवास केला. पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर ४ हजार ४१४ जणांनी मेट्रो सफारीचा आनंद लुटला.
दोन्ही मार्गांवरील मेट्रो सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल व रात्री ८ वाजता बंद होईल. प्रत्येक अर्ध्या तासाला एक गाडी याप्रमाणे फेऱ्या करण्यात येणार आहे.
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
मेट्रो स्थानकावर पोहोचल्यापासून ते दुसऱ्या स्थानकातून बाहेर पडण्यापर्यंत संपूर्ण यंत्रणा ही स्वयंचलित करण्यात आली आहे. तिकीट काउंटरवर ऑनलाइन पैसे दिल्यानंतर तिकीट मिळते. त्यानंतर स्वयंचलित यंत्राद्वारे तिकिटावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्लॅटफाॅर्मवर जाण्यास परवानगी दिली जाते. तीन डब्यांच्या मेट्रोला प्रत्येकी चार स्वयंचलित दरवाजे आहेत. आत प्रवेश केल्यानंतर संपूर्ण वातावरण वातानुकूलित होते. त्याचबरोबर चार्जिंग व्यवस्थाही केली होती. प्रत्येक डब्यात एलइडी स्क्रीन असून आपण कोणत्या स्थानकापर्यंत प्रवास करू शकतो याची माहिती दिली आहे. स्वयंचलित दरवाजाच्यावरच एक स्क्रीन आहे त्यावर मेट्रोचा मार्ग, तसेच पुढे कोणते स्थानक आहे याची माहिती दर्शवली जात आहे.