Pune Metro| पुण्यातही लवकरच धावणार चालकाविना मेट्रो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:01 PM2022-09-20T12:01:45+5:302022-09-20T12:02:27+5:30
नव्या संगणक प्रणालीचे काम सुरू, दिल्लीत चाचणी यशस्वी...
पुणे : महामेट्रो पुण्यातील मेट्रो प्रकल्पात लवकरच कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टिम ही संपूर्ण संगणकीय प्रणाली सुरू करणार आहे. त्याची चाचणी सध्या सुरू आहे. ती यशस्वी झाली की पुणे मेट्रो चालकाविना धावण्यास सज्ज होईल. दिल्लीत अशी चाचणी यशस्वी झाली असून तिथे चालकाविना मेट्रो धावत आहेत.
गाडीला होऊ शकणाऱ्या सर्व अपघातांची शक्यता विचारात घेऊन ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. तीन डब्यांच्या एका गाडीत साधारण १ हजार प्रवासी असतात. त्यांचे जीव कोणत्याही स्थितीत धोक्यात सापडू नये यासाठी जगभरातील सर्वच मेट्रोंमध्ये आता अशी प्रणाली वापरण्यात येते. कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टिम असे या प्रणालीचे नाव आहे. गाडी चालवताना यात चालकाची गरजच पडत नाही. मार्गावर धावणारी प्रत्येक गाडी विनाचालक धावू शकते. तिचा सर्व प्रोग्रॅम आधीच फिड करून ठेवलेला असतो.
अशी आहे सिस्टिम
- मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या, सर्व स्थानके, सर्व सिग्नल्स, गाड्यांचा वेग, ब्रेक दाबल्यानंतर गाडी किती अंतर पुढे जाऊन थांबते अशा असंख्य गोष्टींचा अभ्यास करून हा प्रोग्रॅम फिड करून ठेवलेेला असतो. त्यामध्ये कोणी ठरवले की एखादी गाडी प्रचंड वेगाने सोडायची तरीही ते शक्य होणार नाही, किंवा एकदम हळू न्यायची तरीही तसे होणार नाही.
- स्थानक आले की गाडी थांबणारच व निश्चित केलेली वेळ संपली की ती सुरू होणारच. कोणत्या गाडीचा वेग कुठे व किती असेल हेही या प्रणालीच निश्चित केलेले असते. ते करताना तिच्या मागे पुढे असणाऱ्या अन्य गाड्यांच्या वेगाचाही विचार केलेला असतो.
- संपूर्ण ऑटोमॅटिक अशी ही प्रणाली असून सध्या पुणे मेट्रोत त्याची चाचणी करण्यात येत आहे. ती यशस्वी झाली की पुणे मेट्रोत या सिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे.
प्रवाशांची सुरक्षितता याला महामेट्रोने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यातूनच ही सिस्टिम वापरण्याचा निर्णय महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित व अन्य वरिष्ठ स्तरावर झाला. यामुळे संपूर्ण मेट्रोचा प्रवास हा १०० टक्के पूर्ण सुरक्षित असा राहणार आहे.
- हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, जनसंपर्क, महामेट्रो