Pune Metro: वनाज ते डेक्कन मेट्रोची होतेय दररोज चाचणी; महामेट्रोला प्रतीक्षा परीक्षणाची

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 11:12 AM2022-10-07T11:12:07+5:302022-10-07T11:12:15+5:30

दिल्लीच्या कमिशनर ऑफ मेट्रोरेल सेफ्टी यांचे परीक्षण होऊन प्रमाणपत्र मिळाले की, लगेचच पुण्याची ही पहिलीवहिली मेट्रो थेट डेक्कनपर्यंत धावू लागेल

Pune Metro Daily testing of Vanaj to Deccan Mahametro waiting test | Pune Metro: वनाज ते डेक्कन मेट्रोची होतेय दररोज चाचणी; महामेट्रोला प्रतीक्षा परीक्षणाची

Pune Metro: वनाज ते डेक्कन मेट्रोची होतेय दररोज चाचणी; महामेट्रोला प्रतीक्षा परीक्षणाची

googlenewsNext

पुणे : वनाजपासून थेट डेक्कनपर्यंत मेट्रोची सध्या रोज चाचणी सुरू आहे. दिल्लीच्या कमिशनर ऑफ मेट्रोरेल सेफ्टी यांचे परीक्षण होऊन प्रमाणपत्र मिळाले की, लगेचच पुण्याची ही पहिलीवहिली मेट्रो थेट डेक्कनपर्यंत धावू लागेल. महामेट्रो प्रशासनाला आता परीक्षणाची प्रतीक्षा आहे. साधारण नोव्हेंबरच्या मध्यावर व्यावसायिक तत्वावर ही मेट्रो सुरू होईल.

नदीपात्राच्या बरोबर कडेने धावणारी मेट्रो पुणेकरांच्या आकर्षणाचा विषय झाली आहे. खडकवासला धरणातून मध्यंतरी नदीत पाणी सोडले होते, त्यावेळी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते. त्यावेळी नदीत कडेला उभ्या केलेल्या उंच खांबांवरून धावणाऱ्या मेट्रोला अनेक पुणेकरांनी मोबाइलमध्ये टिपून घेतले. आताही नदीचे पाणी कमी झाले असले तरी किनाऱ्याने धावणारी मेट्रो पाहण्यासाठी काठावर गर्दी होत असते.

सध्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या ५ किलोमीटरच्या अंतरावर मेट्रो व्यावसायिक तत्वावर सुरू आहे. हे अंतर फारच थोडे असल्याने सध्या प्रवाशांचा प्रतिसाद बराच घटला आहे. स्वत:च्या गाडीवर हे अंतर पार करता येत असल्याने मेट्रोचा लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आता डेक्कनपर्यंत मेट्रो धावू लागल्यानंतर मात्र हा प्रतिसाद वाढेल, असा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. त्यानंतर पुढे महापालिका स्थानकापर्यंतही लवकरच मेट्रो नेण्यात येईल. त्यादृष्टीने कामाला गती देण्यात आली आहे.

देशभरातील मेट्रोच्या सुरक्षा परीक्षणाची जबाबदारी दिल्लीच्या कमिशनर ऑफ मेट्रोरेल सेफ्टी यांच्याकडे आहे. त्यांचे मेट्रोशी संबंधित व वेगवेगळ्या विषयांचे तज्ज्ञ एकत्रितपणे मेट्रो मार्गाची सर्व प्रकारची तांत्रिक पाहणी करतात. त्यानंतर वेग व अन्य गोष्टींबाबत साधारण ६ महिन्यांसाठीचे प्रमाणपत्र देतात. त्यानंतर पु्न्हा पाहणी होते व मग मुदत वाढवून तसे प्रमाणपत्र दिले जाते. ही पाहणी मेट्रोरेलसाठी बंधनकारक आहे. त्यांच्या परवानगीशिवाय मेट्रोमधून प्रवासी वाहतूक सुरूच करता येत नाही.

त्यामुळे महामेट्रो प्रशासनाला आता या समितीची प्रतीक्षा आहे. प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले की, आताच्या चाचणीत कोणतेही अडथळे येत नाहीत. सिग्नल व अन्य सर्व तांत्रिक क्षमता योग्य आहेत. त्यामुळे वनाजपासून निघालेली गाडी नियोजित वेळेत बरोबर छत्रपती संभाजी उद्यान स्थानकापर्यंत पोहोचते आहे. तज्ज्ञ समितीची पाहणी झाली व त्यांचे प्रमाणपत्र मिळाले की कधीही हा मार्ग सुरू करता येईल.

''मेट्रोचे अंतर वाढण्याविषयी पुणेकरांमध्ये उत्सुकता आहे. कोरोना व अन्य काही अडथळे कामात आले नसते तर आतापर्यंत हा मार्ग सुरू झाला असता. त्यामुळे विलंब लागला. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याने महामेट्रो सर्व काळजी घेत आहे. नोव्हेंबरपर्यंत वनाज ते डेक्कन हा मार्ग नक्की सुरू झालेला असेल. - हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, जनसंपर्क, महामेट्रो.'' 

Web Title: Pune Metro Daily testing of Vanaj to Deccan Mahametro waiting test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.