Pune Metro: एका महिन्यात ‘मेट्राे’ने कमावले तीन कोटी! प्रवासी फेऱ्या २० लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 11:47 AM2023-09-01T11:47:24+5:302023-09-01T12:00:31+5:30
एकूण तिकीट विक्रीत तब्बल ५३.४१ टक्के म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त पुणेकरांनी ऑनलाइन तिकीट खरेदी करून आपण आता स्मार्ट होत असल्याचे सिद्ध केले....
पुणे : मोटरसायकलवर मिरवत रस्त्याने फिरणाऱ्या पुणेकरांनामेट्रोची भूल पडली आहे. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या महिनाभरात मेट्रोला तीन कोटी सात लाख ६६ हजार ४८१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. २० लाख ४० हजार ४८४ प्रवासी फेऱ्या झाल्या. एकूण तिकीट विक्रीत तब्बल ५३.४१ टक्के म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त पुणेकरांनी ऑनलाइन तिकीट खरेदी करून आपण आता स्मार्ट होत असल्याचे सिद्ध केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्टला दुपारी मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे लोकार्पण केले. फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट व गरवारे कॉलेज ते रूबी हॉल हा विस्तारित मार्ग सुरू झाला. या मार्गाचे अंतर ११.५ किमी आहे. त्यावर डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान, पीएमसी, सिव्हिल कोर्ट (उन्नत), मंगळवार पेठ, पुणे रेल्वेस्थानक, रुबी हॉल क्लिनिक, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट (भूमिगत) ही ११ स्थानके आहेत. लोकार्पण झालेल्या सायंकाळपासून मेट्रोला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली.
मेट्रो मार्गावर दररोज तर गर्दी आहे. शनिवार व रविवार या गर्दीत लक्षणीय वाढ होते. प्रत्येक रविवारी एकूण प्रवासी संख्या एक लाखापेक्षा जास्त होते. ऑगस्ट महिन्यात सर्वांत जास्त प्रवासी संख्या १५ ऑगस्ट या दिवशी होती. या दिवशी एक लाख ६९ हजार ५१२ प्रवासी फेऱ्यांची नोंद झाली. सध्या मेट्रोला सरासरी उत्पन्न नऊ लाख ७८ हजार ७८३ रुपये मिळत आहे. सरासरी ६५ हजार प्रवासी दररोज प्रवास करतात.
तिकीट खरेदी पुणेकरांचा स्मार्टपणा
इलेक्ट्रानिक मशीनद्वारे तिकीट खरेदी : ५३.४१ टक्के
रोखीने पेपर तिकीट खरेदी : ४६. ५९ टक्के
अशी झाली डिजिटल तिकीट खरेदी
माेबाइलद्वारे : ६८ टक्के
मेट्राे कार्डद्वारे : आठ टक्के
किऑस्क मशीनद्वारे : २३ टक्के
ऑपरेटिंग मशीनद्वारे : एक टक्का
फिडर बससेवेबराेबरच रिक्षासेवाही सुरू
प्रवाशांना मेट्रोपर्यंत पोहाेचता यावे, यासाठी मेट्रो आणि पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी फिडर बस सेवा सुरू केली आहे. पीसीएमसी, भोसरी, दापोडी, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, पुणे रेल्वे स्टेशन, वनाझ या स्थानकांवर ही सेवा उपलब्ध आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या सहकार्याने पीसीएमसी, संत तुकारामनगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, पुणे रेल्वे स्टेशन, रुबी हॉल क्लिनिक, मंगळवार पेठ, पीएमसी, गरवारे कॉलेज, नल स्टॉप, आयडियल कॉलनी, आनंदनगर, वनाझ या स्थानकांतून जाण्या-येण्यासाठी शेअर रिक्षा सुरू करण्यात आली आहे.
मेट्रोमुळे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणांमध्ये मोठा हातभार लागत आहे. खासगी वाहनांची रस्त्यांवरची संख्या कमी व्हावी, हा उद्देश साध्य होत असल्याचे दिसते आहे. प्रवाशांसाठी अधिक मार्गांवर फिडर बससेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत निश्चितपणे वाढ होईल. मेट्रोच्या उर्वरित मार्गाचे कामही गतीने सुरू असून लवकरच संपूर्ण मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.
-श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो