Pune Metro: वनाजवरून निघालेली पुणे मेट्रो आता थेट रुबी हॉलपर्यंत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 09:32 PM2023-03-27T21:32:37+5:302023-03-27T21:32:55+5:30
साधारण १३ किलोमीटर व १० स्थानके असलेल्या मार्गावरील सर्व अत्यावश्यक कामे महामेट्रोने पूर्ण केली
पुणे : वनाजवरून निघालेली मेट्रो आता मुठा नदी ओलांडून थेट रुबी हॉलपर्यंत धावेल. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकाच्या पुढे हा धाव आहे. त्याचवेळी पिंपरीवरून निघालेली मेट्रोही सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत येईल. या मार्गावर रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चाचण्या एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण होतील, असे महामेट्रोने जाहीर केले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी साेमवारी (दि. २७) मेट्रो मार्गाच्या प्रगतीची माहिती दिली.
जॉय राइड अशा पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील मेट्रोची वारंवार संभावना होऊ लागल्यानंतर महामेट्रोच्या वतीने मागील महिन्यात कामाला गती देण्यात आली. बरेचसे काम पूर्ण करण्यात आले. प्राधान्यक्रम देत गरवारे महाविद्यालयापासून पुढे, तर फुगेवाडीपासून पुढील मार्गावरील कामे, स्थानकांची कामे पूर्ण करण्यात आली.
डाॅ. दीक्षित म्हणाले, आता या साधारण १३ किलोमीटर व १० स्थानके असलेल्या मार्गावरील सर्व अत्यावश्यक कामे महामेट्रोने पूर्ण केली. एप्रिल महिन्यात रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाच्या पथकाकडून याच्या प्रमाणित चाचण्या घेतल्या जातील. आताही चाचण्या सुरूच असून त्याची पाहणी सुरक्षा आयुक्तालयाच्या एका पथकाद्वारे केली जात आहे. एप्रिलअखेर या प्रमाणित चाचण्या पूर्ण होतील. त्यानंतरचा निर्णय केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे घेतील.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गावर आरटीओ, पुणे रेल्वेस्थानक, रुबी हॉल स्थानक ही महत्त्वाची स्थानके आहेत. या सर्व परिसरात आता रस्त्यावरच्या वाहतुकीला फाटा देत मेट्रोने जाणे सहजशक्य होणार आहे, असेही डॉ. दीक्षित म्हणाले.
तीन ते चार हजार विद्यार्थी घेऊ शकतील लाभ
पुणे रेल्वेस्थानकाचा पादचारी पूल मेट्रोच्या कॉनकोर्स मजल्याशी जोडला आहे. त्यामुळे मेट्रो व रेल्वेतील प्रवाशांना दोन्ही ठिकाणी जा-ये करणे सोपे होणार आहे. या भागात शाळा इंजिनिअरिंग कॉलेज, नायडू हॉस्पिटल ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांना या मेट्रो स्थानकामुळे फायदा होईल, असे डाॅ. दीक्षित यांनी सांगितले.
सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल ४ मिनिटांत
डॉ. दीक्षित मेट्रोच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सिव्हिल कोर्ट स्थानकामधून मेट्रोनेच रुबी हॉल स्थानकात आले. यासाठी ४ मिनिटे ०७ सेकंद लागल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोचा वेग यावेळी ताशी १० किलोमीटर इतकाच होता. पूर्ण वेगाने मेट्रो धावेल त्यावेळी यापेक्षा कमी वेळात ती पोहोचेल असे डाॅ. म्हणाले.