Pune Metro: पुणे मेट्रोचे नवे २ मार्ग शहराची २ टोके गाठणार; विस्तारित मार्गांना राज्य सरकारची मंजुरी
By राजू इनामदार | Published: October 14, 2024 06:16 PM2024-10-14T18:16:18+5:302024-10-14T18:17:53+5:30
नवे मार्ग सुरु व्हायला केंद्र सरकारच्या तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीत आता किमान ४ ते ५ महिन्यांचा अवधी जाईल
पुणे : मेट्रोच्या सुरुवातीच्या दोन मार्गांना अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत राज्य सरकारने सोमवारी सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणेमेट्रोच्या विस्तारित मार्गांना मंजुरी दिली. स्वारगेटहून हडपसर-खराडी व स्वारगेटहून खडकवासला तसेच नळस्टॉपवरून माणिकबाग असे दोन विस्तारित मार्ग आता केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असतील. महामेट्रोने या दोन्ही मार्गांचे प्रकल्प अहवाल तयार केले असून राज्यस्तरावर ते आता मंजूर झाले आहेत.
पुण्याच्या अवकाशात मेट्रोचे जाळे
स्वारगेट ते कात्रज या ६ किलोमीटरच्या भुयारी मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरचा राज्य सरकारचा पुणे शहरासाठी हा अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आहे. या मेट्रोमार्गांमुळे पुणे शहराच्या अवकाशात आता मेट्रो मार्गाचे जाळेच तयार होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील प्रवासाच्या वेळेच्या तुलनेत अतिशय कमी वेळात शहराची दोन टोके गाठणे शक्य होणार आहे. वेळेबरोबरच हा प्रवास वातानुकूलित व आरामदायी, विनागर्दीचा, विनाअडथळा असा असणार आहे. हे दोन्ही मार्ग उन्नत म्हणजे रस्त्यापासून किमान २२ ते २८ मीटर उंचीवर असतील.
केंद्राची अंतिम मंजुरी लागणार
महामेट्रोचे वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे सुमारे ३२ किलोमीटरचे मेट्रो मार्ग आता व्यावसायिक तत्वावर सुरू झाले आहेत. यातील शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. स्वारगेट ते कात्रज या ६ किलोमीटरच्या नव्या भुयारी मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या कामाला सुरुवातही झाली आहे. राज्यस्तरावर मंजूर झालेल्या दोन मार्गाचा प्रकल्प अहवाल आता केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडून पाठवण्यात येईल. त्यांच्याकडील या अहवालांची तपासणी केली जाईल. त्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्यांनंतर त्याला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळेल.
सध्याचा मार्ग पूर्ण व्हायला ८ वर्ष
वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सन २०१६ मध्ये केले होते. त्यानंतर हा ३२ किलोमीटरचा, व त्यातील ५ किलोमीटरचा भुयारी मार्ग पूर्ण होण्यास तब्बल ८ वर्षांचा कालावधी लागला. यातील काही स्थानकांची कामे अजूनही अपुरी आहेत. हे दोन्ही मार्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. आता मात्र संपूर्ण मार्ग सुरू असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे अशा दोन्ही शहरांत मिळून या मार्गावर दररोज १ ते सव्वा लाख प्रवासी असतात. सुटीच्या दिवशी मेट्रोला यापेक्षाही जास्त प्रतिसाद मिळत असतो.
नवे मार्ग सुरू व्हायला किती काळ?
नव्या मार्गांच्या मंजुरीला किती कालावधी लागेल याविषयी पुणेकरांमध्ये उत्सुकता आहे. केंद्र सरकारच्या तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीत आता किमान ४ ते ५ महिन्यांचा अवधी जाईल, असे महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर काही महिन्यांनी कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. याही कामाचे टप्पे केले जातील. काम संपूर्ण व्हायला किमान साडेचार वर्ष तरी लागतील, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.
असे आहेत मार्ग
खडकवासला- स्वारगेट- हडपसर- खराडी
एकूण अंतर-२५.५१८ किलोमीटर
स्थानकांची एकूण संख्या- २२
संपूर्ण मार्गाला येणारा खर्च- ८१३१.८१ कोटी रुपये
काम सुरू झाल्यानंतर पूर्ण होण्यासाठीचा कालावधी- साडेचार वर्ष
नळस्टॉप- वारजे-माणिकबाग
एकूण अंतर: ६.११८ किलोमीटर
स्थानकांची संख्या- ६
संपूर्ण मार्गाला येणारा खर्च-१७६५.३८
काम सुरू झाल्यानंतर पूर्ण होण्यासाठीचा कालावधी- साडेचार वर्ष
दोन्ही मार्गांचे एकूण अंतर- ३१.६४
दोन्ही मार्गावरच्या स्थानकांची संख्या-२८
दोन्ही मार्गांचा एकूण खर्च- ९८९७.१९ कोटी
वाहतूक कोंडी कमी व्हायला उपयोग
सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, सोलापूर रस्ता या भागातील वाहतूक कोंडी आता अशक्य झाली आहे. वाहने चालवणारे नागरिक दररोज दिवसभराचे काही तास तरी वाहतूक कोंडीमध्ये अडकतात. या सर्वांवरचा पर्याय मेट्रो आहे. राज्य सरकारच्या मंजूरीनंतर आता स्वारगेटहून खडकवासला व स्वारगेटहून हडपसर खराडी या मार्गाच्या कामाला गती मिळेल. महामेट्रोकडे आता मेट्रोच्या कामाचा बराच मोठा अनुभव आहे. त्यामुळे नव्या मार्गांचे काम आम्ही नक्कीच विहित मुदतीत वेगाने पूर्ण करू शकू.श्रावण हर्डीकर- व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
पुणे सार्वजनिक प्रवासी वाहतूकीत अग्रभागी
महायुती सरकारचा हा निर्णय पुणे शहराच्या वाहतूक कोंडींवरचे मोठे उत्तर ठरणारा आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूकीमध्ये पुण्याचे नाव आता जगातील आधुनिक देशांच्या नकाशावर अग्रभागी येईल. केंद्र सरकारची अंतीम मंजूरीही या दोन्ही मार्गांना लवकरच मिळेल. नव्या दोन्ही मार्गांमुळे पुण्यातील अनेक महत्वाची ठिकाणे, परिसर मेट्रोने जोडला जाणार आहे. यात वेळेची बचत तर होईल, पण पुणेकरांची प्रवासाची दगदगही कमी होईल. - मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, सहकार व नागरी विमान उड्डाण
आणखी एका मेट्रो मार्गाचे काम शहरात सुरू
शहरात शिवाजीनगर हिंजवडी हा २३ किलोमीटरचा आणखी एक मेट्रो मार्ग गतीने तयार होत आहे. तो २३ किलोमीटरचा उन्नत म्हणजे रस्त्यावरूनच आहे. पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर त्याचे काम गतीने सुरू आहे. खासगी कंपनीकडून हे काम सुरू असून त्यांचा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग आता तयार झाला आहे, तर स्थानकांचे काम गतीने सुरू आहे. काम पूर्ण झाल्यावर त्याच कंपनीकडे पुढील ३५ वर्षे संचलनाचे कामही देण्याचा करार झाला आहे.
राजकीय हेतूने निर्णय
विधानसभेची निवडणुक आचारसंहिता येत्या एकदोन दिवसात लागणार आहे. ते लक्षात घेऊन राज्य सरकार अनेक निर्णय घेत आहेत. मेट्रो मार्गांना मंजूरी देण्याचा निर्णयही तसाच असल्याची टीका राज्य सरकारवर होत आहे. घाईघाईत घेतलेला निर्णय, ज्याचा अंमलबजावणीशी थेट संबध यायला बराच मोठा कालावधी आहे असे याबाबतीत बोलले जात आहे.