Pune Metro: पुणे मेट्रोचे नवीन कार्ड; मुदत ५ वर्षे, कसं मिळवणार हे कार्ड, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 01:40 PM2024-10-08T13:40:51+5:302024-10-08T13:41:03+5:30
मेट्रो ॲप किंवा मेट्रो स्थानकांवर असलेल्या ग्राहक सुविधा केंद्रांमधून हे कार्ड खरेदी करता येईल
पुणे : पैसे द्यायचे, कार्ड खरेदी करायचे. त्याची मुदत संपेपर्यंत ते तुम्हीही वापरू शकता, मित्राला देऊ शकता. महामेट्रोने पुण्यातील मेट्रो प्रवासासाठी असे एक कार्ड नुकतेच सुरू केले. महामेट्रोचे पुण्यातील प्रवासासाठीचे हे तिसऱ्या क्रमाकांचे कार्ड आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी ही माहिती दिली. याआधी मेट्रोची विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी पास कार्ड व दुसरे पुणे स्मार्ट कार्ड अशी दोन कार्ड आहेत. ही दोन्ही कार्ड काढण्यासाठी प्रवाशांना आपली सर्व माहिती (केवायसी) महामेट्रोला द्यावी लागते. तिसरे कार्ड घेताना मात्र कसलीही माहिती द्यावी लागणार नाही. कार्ड खरेदी करण्यासाठी कोणतेही कागदपत्र लागणार नाहीत. १०० रुपये अधिक जीएसटी १८ टक्के असे एकूण ११८ रुपये जमा केल्यानंतर कार्ड मिळेल. त्यात एकावेळेस ३ हजार रुपये ठेवता येऊ शकतात. कार्डची मुदत ५ वर्ष आहे. पैसे संपले की त्यात ते पुन्हा टाकता (टॉप अप) येतात. मेट्रो ॲप किंवा मेट्रो स्थानकांवर असलेल्या ग्राहक सुविधा केंद्रांमधून हे कार्ड खरेदी करता येईल.
महामेट्रोने प्रवाशांसाठी जाहीर केलेल्या सर्व सुविधा (सोमवार ते शुक्रवार १० टक्के सवलत, शनिवार व रविवार ३० टक्के सवलत) या कार्डवरही मिळतील. या कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे ते हस्तांतरणीय (म्हणजे एकाकडून दुसऱ्याला देता येऊ शकते) आहे. त्यामुळे कंपन्या, एकाचवेळी अनेक कर्मचारी बाहेर फिरतात अशी कार्यालये यांच्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार आहे. १०० पेक्षा जास्त कार्ड घेतील त्या कंपनीचे नावही कार्डवर देता येणार आहे.
हर्डीकर यांनी सांगितले की, अशा प्रकारचे हस्तांतरणीय कार्ड देशात प्रथमच पुण्यामध्ये वापरात येणार आहे. सध्या मेट्रोची ७५ पेक्षा जास्त तिकीट खरेदी डिजिटल पेमेंटद्वारे खरेदी होत आहेत. ही भारतातील सर्वांत जास्त टक्केवारी आहे.