Pune Metro: मेट्रोचा नवा उच्चांक! 'अर्धवट मेट्रोचं लोकार्पण झालं', असं म्हणणाऱ्यांना महापौरांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 02:35 PM2022-03-09T14:35:01+5:302022-03-09T14:35:15+5:30
मेट्रोच्या तिसऱ्या दिवशी तब्बल ४२ हजार ०७० पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला असून ५ लाख ७६ हजार एवढी कमाई
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील गरवारे ते वनाज या मेट्रोचे उदघाटन झाल्यावर त्याच दिवशी दुपारी ३ च्या सुमारास मेट्रो सुरु करण्यात आली होती. पुणेकरांनी अतिशय उत्साहात मेट्रोने प्रवास केल्याचे लोकमतच्या पाहणीतून दिसून आले. त्यानंतर लागोपाठ दोन दिवस पुणेकरांनी अतिशय उत्साहाने पुणे मेट्रोने प्रवास केला आहे. तर तिसऱ्या दिवशी नवा उच्चांक गाठल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. तसेच अर्धवट मेट्रोचं लोकार्पण झालं, असं म्हणणाऱ्यांना यापेक्षा मोठी चपराक काय असू शकते? असा टोलाही त्यांनी विरोधकांना फेसबुकच्या माध्यमातून लगावला आहे.
सहा मार्चला २२ हजार पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ८ यावेळेत १८ हजार पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला असून तब्बल २ लाख ५२ हजार ८३० रुपयांची कमाई झाल्याचे महामेट्रोने सांगितले आहे. तर काल तब्बल ४२ हजार ०७० पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला असून ५ लाख ७६ हजार एवढी कमाई झाल्याचे महामेट्रोने सांगितले आहे.
मोहोळ म्हणाले, मेट्रोच्या लोकार्पणानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी प्रवाशी संख्येने नव्या विक्रमाला गवसणी घातली. तिसऱ्या दिवशी दिवसभरात तब्बल ४२ हजार ०७० जणांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिली. अर्धवट मेट्रोचं लोकार्पण झालं, असं म्हणणाऱ्यांना यापेक्षा मोठी चपराक काय असू शकते? असा टोला त्यांनी मेट्रो उदघाटनाला विरोध करणाऱ्यांना लगावला आहे.
पुणे मेट्रो संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
मेट्रो स्थानकावर पोहोचल्यापासून ते दुसऱ्या स्थानकातून बाहेर पडण्यापर्यंत संपूर्ण यंत्रणा ही स्वयंचलित करण्यात आली आहे. तिकीट काउंटरवर ऑनलाइन पैसे दिल्यानंतर तिकीट मिळते. त्यानंतर स्वयंचलित यंत्राद्वारे तिकिटावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्लॅटफाॅर्मवर जाण्यास परवानगी दिली जाते. तीन डब्यांच्या मेट्रोला प्रत्येकी चार स्वयंचलित दरवाजे आहेत. आत प्रवेश केल्यानंतर संपूर्ण वातावरण वातानुकूलित होते. त्याचबरोबर चार्जिंग व्यवस्थाही केली होती. प्रत्येक डब्यात एलइडी स्क्रीन असून आपण कोणत्या स्थानकापर्यंत प्रवास करू शकतो याची माहिती दिली आहे. स्वयंचलित दरवाजाच्यावरच एक स्क्रीन आहे त्यावर मेट्रोचा मार्ग, तसेच पुढे कोणते स्थानक आहे याची माहिती दर्शवली जात आहे.