Pune Metro| मेट्रोच्या खांबांवर जाहिरात केल्यास पोलीस कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 11:13 AM2022-08-26T11:13:01+5:302022-08-26T11:15:02+5:30
पुणे : मेट्रोच्या पुणे व पिंपरी-चिंचवड अशा दोन्ही शहरांमधील एकाही खांबावर कोणालाही कसलीही जाहिरात करता येणार नाही. तसे केल्यास ...
पुणे :मेट्रोच्यापुणे व पिंपरी-चिंचवड अशा दोन्ही शहरांमधील एकाही खांबावर कोणालाही कसलीही जाहिरात करता येणार नाही. तसे केल्यास त्यांच्यावर पोलिसी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिला आहे. दोन खांबांमधील जागेवर पालिकेच्या साह्याने सुशोभीकरण केले जाईल, असेही त्यांनी सांगण्यात आले.
मेट्रोचे खांब ही महामेट्रो कंपनीची मालमत्ता आहे. तिथे जाहिरात करायची नाही, असा महामेट्रोचाच धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे महामेट्रोही त्यावर जाहिरात करणार नाही. अन्य कंपन्यांनाही जाहिरातीसाठी व्यावसायिक वगैरे तत्त्वावर खांब दिले जाणार नाहीत, असे दीक्षित म्हणाले.
डाॅ. दीक्षित म्हणाले...
- महामेट्रो ही प्रवासी वाहतूक करणारी कंपनी आहे. खांब हा त्या वाहतुकीमधील महत्त्वाचा घटक आहे. त्याची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळेच मेट्रोच्या खांबांवर कुठेही जाहिरात करू दिली जात नाही.
- दोन खांबांच्या मधील जागा महापालिकेची मालमत्ता आहे. तिचा ताबा महामेट्रोकडे आहे. ही जागा तशीच पडून राहू नये यासाठी महामेट्रोनेच महापालिकेला त्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यात प्रामुख्याने या जागेचे सुशोभीकरण वगैरे करता येईल.
मेट्रोच्या संचालनाला कसलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनेच हे सुशोभीकरण असणे बंधनकारक आहे. माती भरून तिथे फुलझाडे लावण्याला त्यात प्राधान्य आहे. त्याच्या बदल्यात संबंधिताला तिथे त्याचा एखादा फलक लावण्याची मुभा दिली जाईल.
- हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो जनसंपर्क विभाग