Pune Metro: पंतप्रधान बटन दाबणार अन् मेट्रो धावणार; शनिवार- रविवार तिकिटात ३० टक्के सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 03:20 PM2023-07-28T15:20:28+5:302023-07-28T15:20:51+5:30
पुणे मेट्रोच्या रखडलेल्या विस्तारित मार्गाच्या लोकार्पणाला अखेर १ ऑगस्टचा मुहूर्त मिळाला
पुणे: मेट्रोच्या रखडलेल्या विस्तारित मार्गाच्या लोकार्पणाला अखेर १ ऑगस्टचा मुहूर्त मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे लोकार्पण होणार आहे. ते बटन दाबतील आणि अवघ्या तासाभरात वनाज ते थेट पीसीएमसी या मार्गावर मेट्रो व्यावसायिक तत्त्वावर सुरू होईल. दर शनिवार, रविवारी तिकीट दरात महामेट्रोने सर्व प्रवाशांसाठी ३० टक्के सवलत जाहीर केली आहे. महामेट्रोचे ऑपरेशन विभागाचे संचालक विनोदकुमार अग्रवाल व जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे यांनी ही माहिती दिली.
वनाज ते पीसीएमसी या मार्गाचे नियमित तिकीट ३५ रुपये असेल, शनिवार व रविवार त्यात ३० टक्के सवलत मिळेल. वनाज ते सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंतचे तिकीट २५ रुपये असेल व त्यातही शनिवार, रविवार तिकीट दरात ३० टक्के सवलत असेल. तिकिटे ऑलनाइन पद्धतीनेही मिळतील, तसेच त्यासाठी खास मास्टर कार्डही काढण्यात येणार आहे. स्थानकांपर्यंत पीएमपीएमएलसह काही खासगी वाहनांची फिडर सेवा असेल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तब्बल १९ सरकते जिने
वनाज ते पीसीएमसी या मार्गावर सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक हे महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकात जमिनीखाली पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे स्थानक आहे, त्याच्या बरोबर वरच्या बाजूस वनाज ते रामवाडी या उन्नत मार्गाचे स्थानक आहे. प्रवाशांना या स्थानकात त्यांना जिथे जायचे आहे त्या स्थानकात जावे लागेल. त्यासाठी या स्थानकात तब्बल १९ सरकते जिने आहेत. त्याशिवाय लिफ्टची, साध्या जिन्यांचीही व्यवस्था आहे. संपूर्ण स्थानक वातानुकूलित आहे. एका वेळी काही हजार प्रवाशांना सामावून घेण्याची या इंटरचेंज स्थानकाची क्षमता आहे.
पादचारी पूल होणे बाकी
स्वारगेट, मंडई, कसबा पेठ ही भुयारी मार्गाची तीन स्थानके वगळता मेट्रोचे जाहीर केलेले वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे दोन्ही मार्ग पूर्णपणे तयार झाले आहेत. काही स्थानकांकडे रस्त्यावरून स्थानकात यायचे पादचारी पूल तयार होणे बाकी आहे, तसेच स्थानकांमधील काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. मात्र, रेल्वे सुरक्षा आयुक्त कार्यालयाकडून मेट्रो सुरू करण्याविषयीचे प्रमाणपत्र सर्व चाचण्यानंतर मिळाले असून त्यामुळेच हे मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलिस कवायत मैदानातून हाेणार लाेकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या ठिकाणी येणार नाहीत. ते बहुधा पोलिस कवायत मैदानातून मेट्रोसह अन्य काही प्रकल्पांचे बटन दाबून लोकार्पण करतील. लोकमान्य टिळक पुरस्कार मोदी यांना जाहीर करण्यात आला असून, तोच त्या दिवशीचा त्यांचा मुख्य कार्यक्रम आहे. त्यांचा दौरा निश्चित झाला असला तरी कार्यक्रमांच्या वेळा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.