Pune Metro: पुणे मेट्रोच्या दोन मार्गिकांचे हाेणार पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:38 AM2023-07-31T09:38:54+5:302023-07-31T09:39:41+5:30
मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन करण्यात येणार...
पुणे : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि. १ ऑगस्ट) पुण्यात येत आहेत. त्यावेळी मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे, तसेच पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तिथे पूजा-अर्चा केल्यानंतर स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ११:४५ वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर दुपारी १२:४५ मिनिटांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
मेट्रोच्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. वेस्ट टू एनर्जी मशीनचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. पुणे महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २ हजार ६५८ घरांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे ११९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६,४०० हून अधिक घरांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.