Pune Metro: राजकीय गदारोळामुळे पुणे मेट्रोचे काम रखडले; राजकीय दबावातून झाले अपुऱ्या मार्गाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 12:34 PM2023-03-09T12:34:03+5:302023-03-09T12:34:33+5:30
सद्यस्थितीत अक्षरशः दोन चार पुणेकरांना घेऊन मेट्रोला धावावं लागतंय
राजू इनामदार
पुणे : काम पूर्ण झाल्यानंतरही केवळ राजकीय सिग्नल मिळत नसल्याने पुणेमेट्रोचे विस्तारीत मार्ग सुरू होणे रखडले असल्याचे समजते. वर्षभरापूर्वी काही कामे अपूर्ण असतानाही राजकीय दबावातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अपुऱ्या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. आता वर्ष उलटल्यानंतर बहुसंख्य कामे पूर्ण होऊन सर्व मार्ग सुरू होण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, असे असतानाही केवळ राजकीय गदारोळामुळे निर्णय होत नसल्याची चर्चा आहे.
वर्षभरात फूटभरही वाढली नाही धाव
सध्या वनाज ते गरवारे महाविद्यालय हा साधारण फक्त ५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरू आहे. पिंपरी ते फुगेवाडी हा दुसरा साधारण तेवढ्यात अंतराचा दुसरा एक मार्ग सुरू आहे. वर्षभरापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या मार्गांचे उद्घाटन झाले. त्यानंतर पुढील मार्ग त्वरित सुरू होणे अपेक्षित होते. मात्र या दोन मार्गांच्या पुढे मेट्रोची धाव फूटभरही वाढलेली नाही. त्यामुळे या दोन्ही मेट्रो मार्गांविषयी प्रवाशांमध्ये सुरू असलेला उत्साह आता मावळला आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर तर अनेकदा दोन चार प्रवाशांना घेऊन मेट्रोला धावावे लागत आहेत.
असा आहे मूळ मेट्रोमार्ग
पुणे मेट्रोचे २ मूळ मार्ग वनाज ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट असे साधारण ३१ किलोमीटरचे आहेत. त्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या ५ किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. वनाज ते रामवाडी मार्गावर प्रत्येक एक किलोमीटरवर स्थानक आहे. वनाज, आयडीयल कॉलनी, आनंदनगर, एसएनडीटी, गरवारे महाविद्यालय (सध्या सुरू असलेला मार्ग) व त्यापुढे डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, त्यापुढे महापालिका भवन, कामगार पुतळा अशा मार्गाने ही मेट्रो जाणार आहे. पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाच्या पुढेही प्रत्येक १ किलोमीटरवर अशीच स्थानके आहेत.
काम पूर्ण पण सुरुवात नाही
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यावेळी अन्य मार्गाचे काम सुरू होते. स्थानकांचेही काम अपुरे होते. आता वर्षभरानंतर यातील बहुसंख्य कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. इमारत बांधणी, त्यावरचे मार्ग, सिग्नलिंग अशी कामे झालेली आहेत. पिंपरी ते फुगेवाडी हा मार्ग पुढे सिव्हिल कोर्टपर्यंत व वनाज ते गरवारे हा मार्गही पुढे सिव्हिल कोर्टपर्यंत पूर्ण झाला आहे. वर्षभरात महामेट्रोने सातत्याने पाठपुरावा करत स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाचे काम वगळता बहुसंख्य कामे पूर्ण केली आहेत. किरकोळ कामे शिल्लक आहेत, मात्र पंतप्रधानांनी वनाज ते गरवारे व पिंपरी ते फुगेवाडी या दोन मार्गांचे उद्घाटन केले. त्यावेळीही काही कामे शिल्लकच होती, पण तरीही हे दोन मार्ग वाजतगाजत सुरू करण्यात आले.
इंटरचेंज स्थानकही सज्ज
या दोन्ही मार्गाची सिव्हिल कोर्टपर्यंत तीन चारवेळा यशस्वी चाचणी घेण्यात आली. यापैकी सिव्हिल कोर्ट स्थानक हे इंटरचेंज स्थानक आहे. तिथे उन्नत म्हणजे रस्त्याच्या वरून धावणारी व भुयारीमार्गे अशा दोन्ही मेट्रो एकत्र येतात. त्यामुळे पिंपरीतून येणाऱ्या प्रवाशाला कोथरूडला जायचे असेल तर तो या स्थानकात मेट्रो बदलू शकतो. त्यामुळे मेट्रो प्रवासात अत्यंत महत्त्वाचे असलेले सिव्हिल कोर्ट हे इंटरचेंज स्थानकही आता तयार आहे.
का नाही सुरू होत मार्ग?
दिल्लीतील रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाचे परीक्षण अजून झालेले नाही, असे महामेट्रोकडून सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र या आयुक्तालयाच्या पथकाने दोनवेळा मेट्रोच्या या विस्तारीत मार्गांची पाहणी केलेली आहे. चाचणीचीही त्यांनी माहिती घेतली. त्यामुळे पुन्हा चाचणी घ्यायची असेल, परीक्षण करायचे असेल तर त्यांची वेळ कधीही मिळू शकते, कारण त्या आयुक्तालयाचे हे कामच आहे. मात्र, तशी घाई कोणालाच नसल्याने याबाबत कोणीही गंभीर आहे असे दिसत नाही.
श्रेयवादाची लढाई
सध्या कोणतीही सार्वत्रिक निवडणूक नाही. महापालिका निवडणूक हे निमित्त आहे. ती जाहीर होण्याच्या काही दिवस आधी कार्यक्रम घेऊन राजकीय लाभ मिळवायचा राज्यकर्त्यांचा विचार आहे. अशा मोठ्या प्रकल्पांच्या संदर्भातील निर्णय राज्य सरकार घेत असते. सरकारी स्तरावर सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यामध्ये मेट्रोच्या नव्या मार्गांना आता सुरुवात व्हायला हवी हे कोणाही मोठ्या नेत्याच्या गावी नाही. स्थानिक नेते तसे सांगायला जात नाहीत. महामेट्रो यासंदर्भात स्वत: होऊन काही सुचवायला तयार नाही. यापूर्वी त्यांच्या मागे निदान सरकारचा कामे लवकर आटपा असे रेटा असायचा. आता तर तोही नाही. त्यामुळे तेही याबाबतीत आवश्यक तेवढे गंभीर असल्याचे दिसत नाही.
प्रवाशांची गैरसोय
मेट्रोने प्रवास करायची इच्छा असूनही सध्या प्रवाशांना ते शक्य होत नाही. कारण फक्त ५ किलोमीटरसाठी म्हणून त्रास घ्यायची कोणाचीही तयारी नाही. मोठे अंतर जायचे असेल तर काही मेट्रोने व काही रिक्षा किंवा बसने असा प्रवास करणे अशक्य असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. मार्ग सुरू नाही, पण ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांचा मात्र त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. विशेषत: स्थानकांच्या कामासाठी म्हणून अनेक ठिकाणचे पदपथ अडवण्यात आले आहेत.
केवळ परीक्षण व प्रमाणपत्र घेणे बाकी
मेट्रो मार्ग सुरू करण्याआधी रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. त्यासाठी ते मेट्रो मार्गासह, स्थानके, त्यामधील सुविधा, प्रवाशांची सुरक्षा अशा अनेक गोष्टींचे परीक्षण करतात. दोन्ही मेट्रो मार्गावरील बहुसंख्य कामे पूर्ण झाली आहेत. काही किरकोळ गोष्टी शिल्लक आहेत. ३१ मार्चपूर्वी त्या पूर्ण करण्याचे महामेट्रोचे उद्दिष्ट आहे. परीक्षण होऊन आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाले की मेट्रो मार्ग कधीही सुरू करता येतील. - डॉ. ब्रिजेश दीक्षित- व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
लवकरच कामांचा आढावा घेऊ
यात राजकीय अडथळ्याचा काहीही संबंध नाही. त्यांची कामे अजूनही सुरू आहेत. ती त्वरेने पूर्ण व्हावीत यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत. राजकीय लाभ उठवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. पंतप्रधानांच्या हस्ते जे मार्ग सुरू करण्यात आले, त्याचे सुरक्षा आयुक्तांकडून परीक्षण पूर्ण होऊन प्रमाणपत्र मिळाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच या कामाचा महामेट्रोकडून आढावा घेण्यात येईल व मार्गही लवकरच सुरू होतील.- मुरलीधर मोहोळ, माजी महापौर, प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पक्ष