Pune Metro: पुणे मेट्रोने गाठले डेक्कन अन् दापोडी; उर्वरित मार्गही लवकरच सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 11:56 AM2022-08-17T11:56:41+5:302022-08-17T11:56:52+5:30
स्वातंत्र्यदिनी ८७ हजाराहून अधिक प्रवाशांंनी घेतला लाभ
पुणे : मेट्रो अखेर वनाज ते डेक्कन आणि पिंपरी ते दापोडीपर्यंत धावली. स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवाचे औचित्य साधून साेमवारी (दि. १५) वरील दोन्ही ठिकाणी चाचणी घेतली आणि ती यशस्वी देखील झाली. या दोन्ही मार्गांवर सोमवारी एका दिवसात ८७ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला.
दरम्यान, मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी ते फुगेवाडी या दोन्ही मार्गांचे दि. ६ मार्च राेजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले हाेते. हे दोन्ही मार्ग प्रत्येकी ५ किलोमीटरचे आहेत. त्यामुळे सुरुवातीला महिना वगळता दोन्ही मार्गांवरील प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला होता. त्यामुळेच दोन्ही मार्ग किमान एक स्थानक पुढे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी होत होती.
मेट्राेतील धम्माल
- महामेट्रोने त्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत सोमवारी सकाळी या दोन्ही मार्गांची चाचणी घेण्यात आली. वनाजपासून सुरू झालेली मेट्रो गरवारे स्थानक पार करून डेक्कन स्थानकापर्यंत नेण्यात आली. त्याचवेळी पिंपरी स्थानकापासून सुरू केलेली मेट्रो फुगेवाडी स्थानक पार करून दापोडीपर्यंत गेली. यावेळी गाड्यांचा वेग ताशी १५ किलोमीटर असा होता. दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्या.
- या दोन्ही मार्गांवर सोमवारी दिवसभरात ७५ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट होते, प्रत्यक्षात ही संख्या महामेट्रोने सायंकाळीच पार केली. रात्री उशिरापर्यंत मेट्रो धावत होती. सकाळपासून दर अर्ध्या तासाने सुरू असलेल्या मेट्रोमधून दोन्ही मार्गावर ८७ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी प्रवास केला. त्यात लहान मुलांपासून, महाविद्यालयीन युवक-युवती, कुटुंबांचाही समावेश होता.
- महामेट्रोने सोमवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त मेट्रोत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यासही मुभा दिली होती. त्याचाही लाभ मुला-मुलींच्या ग्रुपनी घेतला. कविता तसेच किस्से वगैरे गोष्टी करत अनेकांनी मेट्रोच्या प्रवासाची परतीचे तिकीट काढत धम्माल केली. मेट्रोचे या आधीचे दोन्ही मार्गांची मिळून एका दिवसाची प्रवासी संख्या ६७ हजार २८० होती. सोमवारी एका दिवसात या दोन्ही मार्गावर मिळून ८७ हजार ९९३ जणांनी प्रवास केला.
''मेट्रोचे उर्वरित मार्गही त्वरित सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मेट्रो हा जगभरात मान्य झालेला सर्वोत्तम उपाय आहे. डेक्कन ते सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत आणि दापोडी ते शिवाजीनगरपर्यंतचे कामही गतीने सुरू असून तोही मार्ग लवकरच सुरू करण्यात येईल. - ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक. महामेट्रो''